सरळसेवा भरती पाठपुराव्याला यश
चांदवड उदय वायकोळे
आज दि 17 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने सरळसेवा गट क ,तसेच गट ब अराजपत्रित भरती बाबत परिपत्रक काढल्याने परिक्षार्थ्यांमधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपासून महापोर्टल रद्द झाल्याने पुढील परीक्षा कश्या होणार हे चित्र स्पष्ट होत नसल्याने परीक्षार्थी संभ्रमात पडले होते. याकरिता आमदार डॉ राहुल आहेर, आमदार रोहितदादा पवार, कलपेश यादव, आमदार चिमणराव पाटील आदींसह अनेक राजकीय पदाधिकारी यांनी पाठपुरावा केला होता.
नवीन शासन परिपत्रकात नमूद केले आहे की जिल्हा निवड समित्या,राज्यस्तरीय निवड समित्या यांनी पदभरती करताना महाआयटी मार्फत निवड केलेल्या एका vendor ची निवड करून परीक्षा पार पाडाव्या.पदांची जाहिरात,निवडप्रक्रिया ते अंतिम यादी प्रसिद्ध करणे ही जबाबदारी निवड समितीची राहील.उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षा अर्ज स्वीकारणे,परीक्षा शुल्क स्वीकारणे,योग्य ती प्रक्रिया करून प्रवेशपत्र तयार करणे,शिफारस निवड झालेल्या/न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे यासंबंधी निवड समितीने vendor शी सामंजस्य करार किंवा करारनामा करणे आवश्यक राहील.परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका तज्ञ व्यक्तींकडून तयार करून घेण्याची जबाबदारी निवड समिती अध्यक्ष यांची असेल.अश्या अटी व सूचना करण्यात आल्या आहेत. अनेक दिवसांपासून परीक्षार्थी संभ्रमात होते तरी पुढे परीक्षा कधी होईल याकडे उमेदवारांचे लक्ष लागून आहे.






