सायबर सुरक्षा परिषद
बीएसईमध्ये ‘सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्स – २०२०’
राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी
‘सायबर सुरक्षा’ महत्वाचा मुद्दा – मोहंती
जितेंद्र गायकवाड
मुंबई, दि. १० : – राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ हा आता महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ – ‘सेबी’चे सदस्य एस. के. मोहंती यांनी आज येथे केले.
सेबी, बाँम्बे स्टाँक एक्स्चेंज – बीएसई आणि महाराष्ट्र सायबर यांच्यावतीने ‘सायबर सिक्युरिटी कान्फरन्स – २०२०’ परिषदेचे आयोजन स्टॉक एक्सचेंज येथे करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मोहंती प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
बीएसईच्या सभागृहात आयोजित या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सायबरचे प्रमुख तथा विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, डिजीटल सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या – डिएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमा वेदश्री, एनसीआयआयपीसीचे महासंचालक अजित वाजपेयी, ‘सर्ट-इन’चे महासंचालक संजय बहल यांची बीजभाषणे झाली.
प्रमुख पाहूणे श्री. मोहंती म्हणाले, ‘भारतीय वित्तीय क्षेत्रातील नियामक संस्थांसह आणि विविध घटकांच्या हितरक्षणासाठी कार्यरत असे महाराष्ट्र सायबर यांनी संयुक्तपणे आय़ोजित केलेली ही परिषद महत्त्वपुर्ण अशीच आहे. वित्तीय संरचना आणि गुंतवणूक क्षेत्राच्या दृष्टीने सुरक्षेचे अनेकविध प्रय़त्न केले जात आहेत. सायबर हल्ल्यांपासून आणि विघातक शक्तींच्या हस्तक्षेपापासून भांडवली बाजार आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात विविध घटकांनी एकास्तरावर एकत्र येऊन माहितीचे आदान-प्रदान करणे आवश्यक आहे. सायबर हल्ल्यात गुंतलेल्या शक्तींपासून कुणीही सुरक्षित नाही. त्यामुळे ज्यांना अशा हल्ल्यांचा अनुभव आहे, अभ्यास आहे अशांनी ही माहिती स्वतःपुरती मर्यादीत ठेवता कामा नये. सायबर हल्ल्यांना परतावून लावणारी परिपुर्ण अशी प्रणाली अस्तित्वात नाही. तुम्ही तुमची प्रणाली जितकी अद्ययावत करत आहात, त्याहून अधिक प्रभावी प्रणाली विघातक शक्ती विकसित करण्यात पुढे राहू शकतात. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून, परस्पर सहकार्यातून भांडवली बाजार आणि सामान्यातील सामान्य गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सदैव सतर्क रहाणे आणि प्रय़त्न करणे आवश्यक आहे.’
यावेळी श्री. मोहंती यांनी सेबीतर्फे सायबर सिक्युरिटी इंडेक्स अंतर्गत भांडवली बाजाराशी निगडीत डिपॉझीटरी, ब्रोकर्स, क्लिअरिंग हाऊसेस यांना सायबर सुरक्षेसाठीचे उपाय योजनांबाबत प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती दिली.






