?Big Breaking… अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा..!वाझे प्रकरण आले अंगाशी..!
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.
यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असतानाच विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. आता नैतिकतेचे भान राखून अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. अशातच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यात तातडीची बैठक झाली आहे. दरम्यान, यानंतर अनिल देशमुख आता राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांमार्फत दिली जात होती.
अखेर, अनिल देशमुख हे राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ‘देशमुख आपला राजीनामा सोपवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमल्यामुळे राजीनामा देण्याची तयारी स्वतः अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे दर्शवली होती. शरद पवार यांनी देखील राजीनाम्याला होकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील हा राजीनामा मंजूर करतील,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.






