पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने पुण्याहून 31 बसेसची व्यवस्था
फहिम शेख
नंदुरबार दि.12-लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकलेल्या आदिवासी नागरिकांना आपल्या गावी पोहोचविण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या प्रयत्नामुळे 31 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसने पुण्यातील हे सर्व नागरिक नंदुरबार, धुळे आणि पालघर जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचतील.
पालकमंत्री पाडवी यांनी आपल्या संपर्क कार्यालयामार्फत आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. नागरिकांची एकत्रित यादी करून आदिवासी विभागामार्फत त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले.
नंदुरबारसाठी 15 बसेस नंदुरबारसाठी, धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्रीसाठी 14 आणि पालघरसाठी 2 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची भोजन व्यवस्थादेखील आदिवासी विकास विभागाच्या संबंधित प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. या सर्व नागरिकांनी आपल्या गावी जाण्याची सोय झाल्याने पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहे.प्रत्येक वाहनात 20 ते 25 नागरिक प्रवास करीत असून 682 नागरिक आपल्या गावी परतणार आहेत.






