Amalner: खून प्रकरणातील आरोपी युक्तीने पोहचवले पारोळा येथे… आणि टळला खूप मोठा अनर्थ..!
अमळनेर दाजीबा नगर येथील अक्षय भिल खुन प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असल्याने पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी आरोपींना पहाटेच पारोळा पोलिस ठाण्यात हलवून न्यायालयात ऑनलाइन हजर केले. यामुळे संतप्त जमावाचे आरोपींवर हल्ला करण्याचा हेतू पोलिसांनी उधळून लावला आणि न्यायालयीन कामकाज पूर्ण केले. यावेळी न्यायालयाने संशयीत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला आणि शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहिली.
अमळनेर शहरातील दाजीबा नगरमधील अक्षय भिल याचा क्षुल्लक कारणावरून खून झाला यामुळे संतप्त भिल्ल समाजाने शहरात दुसऱ्याच दिवशी रास्ता रोको आंदोलन करून आरोपींना ताब्यात देण्याची मागणी केली होती. यावेळी संतप्त जमावाने काही वाहनाचे नुकसान केले होते. त्यावेळी पोलिसांनी परिस्थिती हाताळत शांतता प्रस्थापित केली होती. परंतु त्यांचा संताप अजूनही शांत झालेला नसल्याचा अंदाज पोलिसांना आला आणि आरोपी रोहित सरोदे, राहुल सरोदे, अर्जुन सरोदे यानादोन दिवसानंतर न्यायालयात आणले जाईल ही माहिती होती म्हणून अक्षय भिल याचे नातेवाईक आणि समाज संतप्त होत एकत्र होऊ लागला होता. यातून आरोपींवर सामूहिक हल्ला होऊ शकतो, याचा अंदाज पोलिसांना आला
म्हणून कायदा व सुव्यवस्था बिघडून आणखी अनर्थ घडू शकतो हा धोका ओळखून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पहाटेच आरोपीना पारोळा पोलीस ठाण्यात हजर केले होते.
संतप्त जमावाला पोलिसांची उपाययोजना समजू नये म्हणून न्यायालय, अमळनेर पोलीस स्टेशन, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यामुळे पोलिस आरोपींना घेऊन येतील म्हणून दुपारी हळूहळू जमाव देखील तयारीत होता. आरोपीना न्यायालयात आणण्याची वाट पाहिली जात होती. मात्र पोलिसांनी आरोपींना पहाटेच पारोळा पोलिस ठाण्यात नेल्याची थोडीही जाणीव जमावाला झाली नाही.
इकडे जमाव आरोपींची वाट पाहत बसला आणि तिकडे पोलिसांनी आरोपीना संगणक कॅमेरा समोर बसवून न्यायाधीशां समोर ऑनलाईन व्हीडिओ कॉन्फरन्सने हजर केले. यावेळी न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपींची चौकशी व विचारपूस करून न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी आरोपींना पारोळा किंवा अमळनेर येथे ठेवणे धोक्याचे असल्याने न्यायाधीश एस. एस. अग्रवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांना तात्काळ पारोळा येथून जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले. प्रभारी डीवायएसपी कृषिकेश रावळे प्रत्यक्ष घडामोडींवर नजर ठेवून होते.






