अखेर..! कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू !
मनोज भोसले
पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा भावनिक, कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असून ती म्हातारपणाची काठी आहे. त्यामुळे1982 ची जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना लागू व्हावी म्हणून पेन्शनग्रस्त कर्मचाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून अविरत संघर्ष करून उभा महाराष्ट्र पेटवीला होता.त्यातल्या त्यात सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असून तेथील यशवंत स्टेडियम मध्ये सहभागी झालेल्या विविध संघटनेच्या आंदोलनाचा धसका घेऊन महाराष्ट्र शासनाने नाईलाजाने का होईना, पण कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज घेतला आहे. आज मुख्यमंत्र्या सोबत झालेल्या चर्चेत संबंधित विभागाचे मंत्री, विरोधी पक्ष नेते आणि विविध संघटनेचे
कार्यकर्ते उपस्थित होते.दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला आता थोपविता येणार नाही, याची जाणीव होताच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन बहाल करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी राज्य कार्य कारिणीच्या हातात सुपूर्द केला आहे. जुन्या पेन्शनचा हा विजयोत्सव साजरा करताना आज आक्ख नागपूर गुलालमय झाल होत.!
दचकलात ना ? विश्वास बसला नसेल अजूनही तुमचा ! पण, मी खोटे बोलतोय,
कारण आपले अनेक मावळे आजही शिवाजी जन्माला यावा आपल्या नाही तर शेजारच्या घरी असे सांगून,आपला भार इतरांच्या खांद्यावर ढकलत आहे,मूला-मुलींच्या तब्येतीची,त्यांच्या ट्यूशनची कारणे दाखवून तुम लढो हम तुम्हारे कपडे संभालते असे सांगून घरूनच आरोळ्या देत आहे.
बघ्याची भूमिका घेणाऱ्या या कावळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की,रिकाम्या हातांनी टाळ्या वाजवून युद्ध जिंकता येत नाही. त्यासाठी हातात तुतारी घ्यावी लागेल, झोपेच सोंग घेणाऱ्या शासनाला जागे करावे लागेल. विविध प्रकारच्या संघटना आज आपल्या पाठीशी असताना असे कच खाऊन चालणार नाही. जुनी पेन्शन ही आपल्या हक्काची आहे ती कोणाच्या बापाची नाही. पेन्शनसाठी जर आता आपण संघटीत झालो तर आपल्याला पेन्शन पासून कोणीच रोखू शकत नाही.आणि वर दिलेली शीर्षक सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. पण,ह्या लढाईसाठी स्वतःहून बाहेर पडणाऱ्याची, सतत झटणाऱ्याची पेन्शनग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या किती?हा वादाचा आणि संशोधनाचा विषय आहे.
———————————–






