Mumbai Diary: 22 वर्षांनी “ती” परतली देशात.. पोटासाठी देश सोडला… पाकिस्तान मध्ये विकल… तिची हृदयदावक कहाणी…
मुंबई तब्बल २२ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी आखाती देशामध्ये गेलेल्या कुर्ला येथील हमिदा बानो मानवी तस्करीच्या बळी ठरल्या. आखाताऐवजी त्यांना पाकिस्तानमध्ये विकण्यात आले. कुठलेही कागदपत्र नाही की, हातात एक दमडी नाही. आयुष्यात पुन्हा कधी भारतात परतण्याची, आपल्या मुलामुलींना भेटण्याची आशाच त्यांनी सोडून दिली होती. पण, पाकिस्तानच्या एका स्थानिक युट्यूबरच्या मदतीमुळे ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांचा पुन्हा कुटुंबीयांशी संपर्क झाला. अखेर, सोमवारी हमिदा भारतात परतल्या, तेव्हा गेली दोन दशके डोळ्यांत साठवून ठेवलेले अश्रू अनावर झाले.
आखाती देशात घरकाम करण्यासाठी देश सोडला
मूळच्या गुलबर्गा, कर्नाटकच्या असलेल्या हमिदा कुटुंबीयांसोबत कुर्ल्यातील कुरेशी नगर येथे राहत होत्या. अशिक्षित हमिदा यांचा निकाह त्यांच्या कुटुंबीयांनी मोहम्मद हनीफ शेख यांच्याशी लावून तर दिला, परंतु दोन मुली आणि दोन मुलांबाबतीत ते कमालीचे बेफिकीर निघाले. हमिदा यांनी घरकाम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, आखाती देशात घरकाम करण्यासाठी महिलांची मागणी आहे, असे कोणीतरी सांगितल्याने त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला.
आम्हाला कळतही नव्हते तेव्हा ९०च्या दशकात अम्मी परदेशात कामासाठी गेली. काबाडकष्ट करून त्यांनी आम्हा दोन्ही मुलींची आणि एका मुलाचे लग्नही लावून दिले. त्यानंतर सर्वांत धाकट्या मुलाचे लग्न लावून द्यायचे म्हणून अम्मीने पुन्हा परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने विक्रोळीच्या एका महिलेशी संपर्क साधला. २००२ मध्ये ती दुबईला जाण्यासाठी निघाली, परंतु त्यानंतर तिचा कधीही संपर्कच झाला नाही’, हे सांगताना हमिदा यांची मुलगी यास्मीनला भरून आले.
दुबईतून पाकिस्तानात नेऊन विकण्यात आलं
हमिदा त्यावेळी दुबईला तर पोहोचल्या, पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा एका विमानात बसवून पाकिस्तानला नेण्यात आले. तिथे सिंध प्रांतातील झोपडीत त्यांना डांबल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘माझ्यासोबत त्यावेळी एक तमिळ महिला होती. आम्हाला पुरते कळले होते की, आपल्याला विकण्यात आले आहे. आपले पुढे काय होणार याचीही आम्हाला कल्पना होती. म्हणून एका रात्री आम्ही हिंमत करून झोपडीतून पळ काढला. माझ्याकडे असलेल्या पैशांनी मिळेल ते वाहन पकडत कराची गाठले’, हमिदा त्या आठवणी सांगताना गहिवरतात.





