नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट, चौकशीची मागणी
नंदूरबार शेख फहीम मोहम्मद
नंदुरबार पंचायत समितीतल्या लघुसिंचन उपविभागा मार्फत नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील पाताळगंगा नदीवर साठवण बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. सदर काम करताना इस्टिमेट प्रमाणे न करता थातूरमातूर करून बिले काढण्यात आल्याची तक्रार खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केली असून सदर कामात नदीतील माती मिश्रीत वाळु व दगड टाकून पूर्ण करण्यात आले आहे. बंधाऱ्यात कमी जाडीच्या सळ्याचा वापर करण्यात आले आहे. सदर कामात वापरलेले सिमेंट हे सुद्धा कमी दर्जाचे वापरण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर बंधारा शासनाने शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे, म्हणून मंजूर करून लाखो रुपयाचा निधी दिला आहे. मात्र यंदा सर्वत्र जास्त पाऊस पडलेला असताना एक थेंब ही पाणी बंधाऱ्यात शिल्लक नाही. निकृष्ट कामांमुळे पाणी लिकेज होऊन वाहून गेले आहे. त्यामुळे सदर कामांची चौकशी करून संबंधित दोषी अभियंतांवर कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे.






