Weather Alert: थंडी कमी होणार.. फेंगल वादळामुळे राज्यात अवकाळी पावसाचा इशारा..
भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ फेंगल हे चक्रीवादळ (Fengal Cyclone) घोंगावतं आहे. या वादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळपासून राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच थंडी देखील कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी म्हटले आहे की, फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. यात मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल चांगला झाकून ठेवा, असा सल्लाही डख यांनी दिला आहे. दुसरीकडे ०६ डिसेंबरेपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.






