Mumbai

Maharashtra Election Live 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग

Maharashtra Election Live 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग


मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 236 जागा जिंकत नवा इतिहास रचला आहे. महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप (BJP) हा पहिला पक्ष ठरला आहे. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आल्याचे दिसून येत आहे.

14 व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याआधी 15 वी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. यासंदर्भात आता नोटिफिकेशन काढलं जाईल. नोटिफिकेशन निघाल्यानंतर संविधानात्मकरित्या 15 वी विधानसभा अस्तित्वात आली, असं मानलं जाईल. त्यानंतर महायुतीकडून बहुमताचे आकडे आणि सह्या घेऊन सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा जाईल. त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून निमंत्रण देण्यात येईल.

निवडणूक आयोगाचे अधिकारी घेणार राज्यपालांची भेट

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार आहे. सोबतच, निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडून 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होणार आहे.

शिवसेना शिंदे गटाची बैठक

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) राज्यभरातील आमदार मुंबईत यायला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज अॅन्ड लॅड्समध्ये आतापर्यंत 29 आमदार दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या हॉटेलमध्ये सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे. उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून गट नेता म्हणून कोणाची निवड होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर एकीकडे शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. त्याच ठिकाणी भाजप आमदार आशिष शेलार पोहोचले आहेत. त्यामुळे आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button