World

Ind VS Pak Cricket: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रंगणार भारत पाक मध्ये रोमांचक क्रिकेट सामना… पहा कुठे आणि केंव्हा…

Ind VS Pak Cricket: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रंगणार भारत पाक मध्ये रोमांचक क्रिकेट सामना… पहा कुठे आणि केंव्हा…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आता दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद चाहत्यांना लुटता येणार आहे. कारण लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा थरार रंगणार आहे. पण हा सामना कधी आणि किती वाजता सुरु होणार, ही सर्व माहिती समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे संपूर्ण जगाला वेड आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते जगभर पसरलेले आहेत. त्यामुळेच जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येतात तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या महान सामन्याकडे लागतात. अलीकडेच इमर्जिंग आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा विजय झाला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.

दिवाळीच्या खास मुहूर्तावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. दोन्ही देशांचे चाहते या सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांविरुद्ध क्रिकेट सामने खेळतात, मग या आठवड्यात खेळला जाणारा हा सामना कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी चाहते सज्ज
यावर्षी 31 ऑक्टोबरला भारतात अनेक ठिकाणी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे, तर काही ठिकाणी 1 नोव्हेंबरला दिवाळीही साजरी केली जाणार आहे. अमावस्या तिथी दोन दिवसांवर असल्याने सन 2024 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामन्याच्या रूपाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच दिवसांनी रंगणार हा सामना १ नोव्हेबरला होणार आहे. या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे तीन संघांचे चार गट बनवण्यात आले आहेत. कारण भारताच्या गटात भारत आणि युएई हे दोन संघ आहेत. भारताचे या स्पर्धेतील साखळी फेरीत दोन सामने खेळवले जाणार आहे. त्यामधील पहिला सामना हा पाकिस्तानबरोबर असेल तर दुसरा सामना हा २ नोव्हेंबरला युएईबरोबर होणार आहे.

हाँगकाँग सिक्स टूर्नामेंट या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. ही स्पर्धा दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच फॅनकोडवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाणार आहे. भारतीय संघाची कमान 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला फलंदाज रॉबिन उथप्पाकडे सोपवण्यात आली आहे. उथप्पाशिवाय आणखी 6 खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

क्रिकेट चाहत्यांना हाँगकाँग सुपर सिक्सेस ही स्पर्धा माहिती असेल. यावेळी प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात. सहाच्या सहा खेळाडू बाद झाल्यावरच संघ ञल आऊट झाल्याचे घोषित केले जाते. या स्पर्धेची सुरुवात ही १९९२ साली झाली होती. त्यानंतर ही स्पर्धा १९९७ साली थांबवण्यात आली होती. त्यानंतर ही स्पर्धा सातत्याने होऊ शकली नाही. पण आता ही स्पर्धा सात वर्षांनी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button