योगा : निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली- कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
भारताने अवघ्या विश्वाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे निरामय आरोग्याची गुरुकुल्ली *योग* असून 21 जून 2015 पासून आज तागायत योगासनांचा उचित उपयोग करून विश्वातील अनेक देशांमधील लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीत योगासनांचा यथायोग्य उपयोग होत असून यामुळे आनंदी, उत्साही व निरामय आरोग्याकडे वाटचाल होत आहे. प्रत्येकाने सद्यस्थितीतील धकाधकीच्या व तणावयुक्त जीवनशैलीत थोडा वेळ स्वतःसाठी राखून विविध आसने, ध्यान व प्राणायाम करून स्वतःचे जीवन परिवारासाठी, समाजासाठी व देशासाठी सार्थकी लागेल यासाठी योगाला जोपासावे असे आवाहन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.
ते 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगाव व तापी परिसर विद्यामंदिर संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचीत्याने बोलत होते.
18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल पवनकुमार व धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी 30 कॅडेटस सोबत विविध योगासने व प्राणायामाचे प्रकार यथायोग्य पद्धतीने सादर केले.
प्रास्ताविकेत डॉ राजपूत यांनी योग म्हणजे काय ? योगाची आवश्यकता व शास्त्रोक्त पद्धतीने योगासने करण्याची नियमावली उपस्थितांसमोर मांडली. यानंतर सूक्ष्म व्यायामाच्या आधारे योगासनांची पूर्वतयारी करून घेतली. यासोबत उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन त्रिकोणासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन यासोबत बैठ्या स्थितीतील भद्रासन, उस्टासन, शशंकासन आणि पोटावर झोपून करविली जाणारी मकरासन, भुजंगासन आदी उपयुक्त आसने करावून घेतली.
यानंतर प्राणायामाच्या कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, भस्त्रिका व शांतिमंत्राने समारोप केला. यावेळी उपस्थित एनसीसी कॅडेट्सने योगा केल्या नंतर शरीर हलके वाटत असून मनात उत्साह व तरतरीतपणा आल्याचे बोलून दाखवले. यासोबत दिवसाच्या सुरुवातीला योगासनांसाठी विशेष वेळ राखून ठेवू असे मनोगत व्यक्त केले.






