Amalner: चि पार्थ पंतची ( बहुगुणे) आत्मबल आणि आत्मविश्वासाची गोष्ट
अमळनेर चि.पार्थने नीट (NEET Undergraduate) या एमबीबीएस प्रवेश स्पर्धा परीक्षेत ६५० गुण प्राप्त केलेत आणि स्वतःची प्रचंड बुद्धिमत्ता सिद्ध केली.
चि. पार्थ हा डॉ. निखिल बहुगुणे आणि डॉ. प्राजक्ता बहुगुणे या प्रथितयश डॉक्टर दांपत्तीचा ज्येष्ठ चिरंजीव आणि निवृत्त प्राध्यापक रमेश बहुगुणे सर यांचा नातू आहे. हे सर्व ठीक आहे. परंतु पार्थची आत्मबल आणि आत्मविश्वासाची गोष्ट पुढे आहे.
•मागील वर्षी पार्थला एका खाजगी कॉलेजला प्रवेश निश्चित झाला होता. या कॉलेजला पार्थने प्रवेश घ्यावा अशी आई-वडील आणि आजोबांची इच्छा होती. प्रवेशासाठीचा डिमांड ड्राफ्ट तयार झाला होता. केवळ पार्थची मान्यता घेणे बाकी होते (तेव्हा तो अभ्यासासाठी लातूरला रवाना झालेला होता). खाजगी मेडिकल कॉलेजला पार्थने प्रवेश घ्यावा यासाठी त्याचं मन वळवण्याचा भरपूर प्रयत्नही झाला. सारे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कुटुंबीय एका बाजूला आणि एकटा पार्थ बाजूला होता. खाजगी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेण्याचे पार्थने सपशेल नाकारले. नाकारताना तो कुटुंबीयांना म्हटला की, “मी उत्तम गुणवत्ता मिळवीन आणि सर्वोत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळवून दाखवीन. मला फक्त पुन्हा एक वर्ष अभ्यास करू द्या. त्यासाठी मला लातूर येथील चांगल्या क्लासला प्रवेश मिळवून द्या.”
•त्याचा हा प्रस्ताव खूप धाडसाचा आणि महत्त्वाकांक्षी होता. सर्वच कुटुंबीयांना टेन्शन आले होते. सर्व अंगाने विचार केल्यावर कुटुंबाने पार्थला एक वर्षाची संधी देण्याचे मान्य केले. त्यानुसार चिरंजीव पार्थ आणि ८१ वर्षाचे आजोबा प्रा. आर आर बहुगुणे सर लातूर मोहिमेवर निघाले.
•जिद्द आणि चिकाटीने चि. पार्थ अभ्यासाला लागला. आजोबा बहुगुणे सर त्याची ही जिद्द आणि चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रेरणा देत राहिले. कारण त्यांच्या तेवढी व्यापकता आणि शहाणपण पुरेपूर आहे. प्रोजेक्ट मोठा होता.
•ठरल्यानुसार वर्षभर सगळं बरोबर चाललेलं होतं. परीक्षेच्या आदल्या दिवशी पार्थला ताप आला. ऐन परीक्षेच्या वेळेस ही संकट घडी होती. संपूर्ण कुटुंब तणावात आलं. वडील डॉ. निखिल आणि माता डॉ. प्राजक्ता त्यांनी तिथल्या डॉक्टरांच्या मदतीने पार्थला बरे केले. एक वेळ तर अशी आली की परीक्षेला जायला हिम्मत होत नाही असे पार्थने सांगितले. कुटुंबीयांनी त्याला धीर दिला. त्याच्यावरचा मानसिक दबाव कमी झाला.
•पार्थचा आत्मविश्वास आणि आत्मबल ढललेले नव्हते. कारण त्याने वर्षभर सातत्यपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने कठोर परिश्रम केलेले होते.
•तो जिद्दीने परीक्षेला सामोरा गेला आणि त्याने एमबीबीएस या महत्वपूर्ण पदवीस प्रवेश मिळवण्यासाठी 650 गुण मिळवून प्रचंड यश संपादन केले.
•एकजुटीने, एकविचाराने, विवेकाने प्रेरणा केंद्रित केल्या गेल्या तर मनगट, मन आणि मेंदू यांची एकात्मता साध्य होते, सारे सामर्थ्य केंद्रित होते आणि अशक्य ते शक्य होते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
•वयाच्या 81 व्या वर्षी मा. गुरुवर्य प्रा. बहुगुणे सरांचं केलं तेवढं कौतुक कमीच आहे. या वयात बाहेर राहणं, बाहेरचं खाणं इत्यादी शरीराच्या मागण्यांना जिद्दीने आणि चिकाटीने हरवत बहुगुणे सरांनी नातवाच्या यशातला मोठा वाटा उचलला आहे.
•चि. पार्थला आणि डॉ निखिल यास बुद्धिमत्ता, जिद्द आणि चिकाटी बहुगुणे सरांकडून वारसाने मिळाली असे वाटते. बहुगुणे सर अत्यंत विपरीत आर्थिक परिस्थितीतून उच्च विद्या विभूषित झाले. वडील लहानपणी वारलेले, माता अंध आणि त्यातून सतरा विश्व दारिद्र्य. अर्ध्या चड्डीवर स्टेशनवर एका पत्री डब्यातून गोळ्या विकणारा हा मुलगा शिकत राहिला. १९६१ साली मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
आपल्या सुसंस्कृत मातेच्या आणि विद्वान शिक्षकांच्या मार्गदर्शनाने पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रताप महाविद्यालयात शिक्षक म्हणून सर रुजू झाले.
चि. पार्थचे पिता डॉ निखिल बहुगुणे हे देखील प्रचंड बुद्धिमत्तेचे धनी आहेत. ते त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत सिद्ध केलेले आहे.
पार्थने एवढे यश प्राप्त केले आहे की राज्यातल्या मुंबई – पुणेसह कोणत्याही सरकारी मेडिकल कॉलेजला त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. चि. पार्थचं मोठ्ठं अभिनंदन आहेच.
चि. पार्थ, प्रा.बहुगुणे सरांचे, डॉक्टर माता पिता यांचे आणि आजोबा मा. श्री प्रमोद पंत सरांचे ( डॉ प्राजक्ता बहुगुणे यांचे पिता) हार्दिक अभिनंदन!
चि. पार्थला पुढील शैक्षणिक यशासाठी आणि आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
प्रा डॉ एल ए पाटील






