Amalner: उन्हाच्या तडाख्याने महिलेचा मृत्यू..!
अमळनेर गेल्या दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक मे हिटमुळे हैराण झाले आहेत. अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना दि.12 रोजी तांबेपुरा भागात घडली.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33) ही महिला अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेली होती. दि 11 रोजी सायंकाळी ती रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने तिला अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या, यामुळे तिच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले असता त्यांनी ऊन लागल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले, थोडावेळ महिलेला बरेही वाटले. मात्र सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी तात्काळ रिक्षा करून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अमळनेर ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दिर दीपक राजपुत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र सदर मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिलेच्या पश्चात पती, सासू सासरे, दिर असा परिवार असून गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी तर मंगलसिंग राजपूत यांच्या मोठ्या सून होत्या.






