Amalner: शिक्षिकेस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करण्यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे रस्ता रोको..!
अमळनेर पीडित दलित शिक्षिकेस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीतर्फे सोमवारी महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रभारी तहसीलदार अमोल पाटील व एपीआय राकेशसिंग परदेशी यांना निवेदन देण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 28 फेब्रुवारी 23 रोजी पीडित शिक्षिकेला आरोपी नरेंद्र हिंमतराव अहिरराव यांनी अश्लील शिवीगाळ केली. व मारहाण केली याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात सदर आरोपी अहिरराव यांच्या विरोधात पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीस अद्यापही अटक केली नसून आरोपी मोकाट फिरत आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा गावातच फिरत असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
सदर प्रकरणाची संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पूर्णतः कल्पना असून अद्याप अटक
करण्यात आली नसून त्याची पाठराखण केली आहे. भविष्यात सदर पीडित शिक्षिका व परिवारातील लोकांचा घातपात झाल्यास वरील गुन्ह्यातील आरोपी व पोलीस प्रशासन कारणीभूत राहील याची दक्षता घ्यावी व कायदा सुव्यवस्था मालिन होऊ नये यासाठी हे निवेदन देत असल्याचे म्हटले आहे. आरपीआयचे जळगाव जिल्हा महासचिव यशवंत बैसाने, अमळनेर तालुकाध्यक्ष पितांबर वाघ, युवा तालुकाध्यक्ष पंकज सोनवणे, आत्माराम अहिरे, किरण बच्छाव, अजय गव्हाणे, गोपाल पवार, प्रमोद बैसाने, प्रवीण वाघ, रमेश वाघ, अरुण वाघ, बाबुराव संदानशिव, एस. एन. खैरनार, अ. ना. घोलप, एन. आर. मैराळे, घनश्याम घोलप, तानाजी वाघ, चंद्रकांत नेतकर, छंनु मोरे, मनोज मोरे, दुर्गेश पवार, भाईदास कढरे, शीतल वाघ, आशा मंगळे, भटाबाई वाघ, प्रमिला ढिवरे, रत्नमाला सोनवणे आदींनी आंदोलन केले.






