Amalner: जडला भल्या भल्यांना आजार राजकारणाचा..!
अमळनेर येथील अंबर्षी टेकडी गृप यांचे पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय
कामगिरीसाठी खान्देशस्तरीय पूज्य सानेगुरुजी स्मृती पुरस्कार उपविभागीय पोलिस
अधिकारी राकेश जाधव व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश
वाघ,उपाध्यक्षा प्रा.डॉ माधुरी भांडारकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.व्यासपीठावर गझलकार संदीप पटेल (मुंबई), जयश्री कुलकर्णी (नाशिक), विनय पाटील (चोपडा), शरद धनगर (अमळनेर), योगिता पाटील (चोपडा), अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ, उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर होते. मान्यवरांनी सानेगुरुजी यांच्या पुतळ्याचे माल्यार्पण करत कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिलीप सोनवणे यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन भगिनी मंडळाच्या शिक्षीका ज्योती सोनवणे यांनी केले. सत्काराला उत्तर देतांना अंबऋषी टेकडीचे सदस्य आशिष चौधरी म्हणाले, की आज अंबऋषी टेकडीवर तरुणांपासून तर वयोवृद्ध महिला व पुरुष श्रमदान करून आज हजारो झाडे जगली आहेत व त्याचे संवर्धन केले जाते. सानेगुरुजी वाचनालयाने आमच्या चांगल्या कामाचा सन्मान केला यातून कार्य करण्याची अजून प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले.पू सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे आयोजित व्याख्यान
मालेच्या दुसऱ्या दिवशी मराठी गझल मुशायरा कार्यक्रमात गझलकारांनी राजकारण,
स्वातंत्र्य, प्रेम, दुष्काळ आदी बाबींवर प्रकाश झोत टाकला.‘जातीस माणसांनी वाळीत टाकल्याने निघतील प्रश्न बहुदा निकाली, जर बोलले हुतात्मे तर बोलतील इतके, हा देश वाचवाया उगीच केली हमाली’ ही गझल सादर करून जयश्री कुलकर्णी यांनी जातीवाद आणि संविधान तत्वांवर श्रोत्यांचे लक्ष वेधले. विनय पाटील यांनी सध्या तरुणांची ओढ राजकारणाकडे विनाकारण होत असल्याने ‘जडला भल्याभल्याना आजार राजकारण … शिक्षित गाढवांचा दरबार राजकारण’ ही गझल सादर करून तरुणांना उपदेश दिले.योगिता पाटील यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि संवेदनशील घटनांवर प्रकाशझोत टाकत म्हटले ‘घडून जाते घटना आणि मग त्यानंतर चर्चा होते, घडले नसते काहीच जेव्हा, न घडल्यावर चर्चा होते’ शरद धनगर यांनी ‘नको ना पुन्हा इशारा करू तू, नको आठवांचा पसारा करू तू’ ही प्रेम गझल सादर केली. संदीप पटेल यांनी ‘या नभावरती नभाचे घर असावे का’ ही गझल सादर केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ, उपाध्यक्ष प्रा. डॉ. माधुरी भांडारकर, विश्वस्त बापू नगांवकर, संयुक्तचिटणीस सुमित धाडकर, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, पी. एन. भाद लीकर, अॅड. रामकृष्ण उपासनी, ईश्वर महाजन, प्रसाद जोशी, दिपक वाल्हे, निलेश पाटील सह वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. आभार प्रदर्शन दीपक वाल्हे यांनी केले.






