Amalner: अंत्यसंस्कारास लाकडा ऐवजी गोवऱ्या पुरवाव्यात.. विविध सामाजिक संस्थांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
अमळनेर: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोवऱ्या पुरवाव्यात अशी मागणी क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळासह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की गेल्या तीन वर्षा पासून संपूर्ण महाराष्ट्रात माझी वसुंधरा हे अभियान नगर परिषदेच्या माध्यमातून राबविले जात आहे. त्या अंतर्गत वृक्ष लागवडीवर भर
देण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियानात अमळनेर नगरपरिषद ही सहभागी असल्याने एका बाजूने वृक्षारोपण आणि दुसऱ्या बाजूने दहनासाठी लाकूड उपलब्ध करण्यासाठी लाकडाचा ठेका देवून वृक्षतोडीस प्रोहत्साहन ही विसंगती आहे. म्हणून माझी वसुंधरा अभियान राबविल्या जाणाऱ्या वर्षाचे औचित्य साधून चोपडा रोड हिन्दू स्मशानभुमी व खळेश्वर हिन्दू स्मशानभूमी येथे दहन संस्कारासाठी अमळनेर नगर परिषदेकडून गोवऱ्या उपलब्ध करण्यासाठी लाकडा ऐवजी गोवऱ्याचा ठेका देण्यात यावा त्या निमित्ताने वृक्षतोडीस आळा बसून गोवंश संवर्धन व पालनास हातभार लागेल.
खळेश्वर हिन्दू स्मशानभुमी येथे नगरपरिषदे मार्फत स्वरक्षण भिंतीचे काम उत्कृष्ट पणे पुर्ण झाले असून बाकी असलेले लोखंडी दरवाजे व नदीपात्रात उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्याचे लोखंडी रिलिंग लवकरात लवकर बसवून मिळावे. सदर निवेदनाची दखल घेवून समस्त वृक्षप्रेमी हिन्दू बांधवांचा भावनेचा आदर ठेवुन दहन संस्कारासाठी लाकूड ऐवजी गोवऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती क्षत्रिय माळी समाजासह श्री संत सावता माळी सेवा मंडळ, कर्तव्य बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक देवीदास महाजन, गंगाराम महाजन, साहेबराव पवार आदी उपस्थित होते.






