Mumbai Diary: मुंबईतील ती 15 मिनिटे..!जे उघड्या डोळ्यांना दिसलं नाही ते टिपलं कॅमेऱ्याने..!पहा व्हिडीओ..!
मुंबई 07 सप्टेंबर 2022… दुपारपर्यंत सर्वकाही सामान्य होतं. पावसाळा असला तरी ऊन पडलं होतं पण दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अपेक्षित नव्हतं ते घडलं. ऐन संध्याकाळच्या वेळेस अचानक सूर्य गायब झाला… आभाळ दाटून आलं… मिट्ट काळोख झाला… वादळी वारे वाहू लागले… ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट…आणि धो धो कोसळणार पाऊस… आपण प्रत्यक्षात पाहिलेल्या दृश्यापेक्षाही थक्क करणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील फक्त त्या 15 मिनिटांच्या वातावरणामुळे सर्वांना भीती वाटू लागली. आता काय संकट येत आहे, असंच वाटू लागलं. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अचानक असं वातावरण पाहून सर्वांच्याच काळजात धस्सं झालं. नेमकं काय घडत आहे ते कुणालाच समजेना. काही वेळाने पाऊस थांबला, सर्वकाही सुरळीत झालं. पण ती 15 मिनिटं मात्र कुणीच विसरू शकणार नाही. आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या या दृश्यानेच आपल्याला धडकी भरली. पण मुंबईतील त्या 15 मिनिटांत जे आपल्याला प्रत्यक्षात दिसलं नाही ते कॅमेऱ्याने टिपलं.
व्हिडीओत पाहू शकता वर स्वच्छंद आकाश, सूर्यप्रकाशाने लख्खं झालेली मुंबई दिसते आहे. अचानक एका बाजूने काळे ढग येताना दिसतात. अंगावर पांघरूण घ्यावं तसे हे काळेकुट्ट ढग हळूहळू मुंबईवर पसरतात. संपूर्ण मुंबईला झाकून टाकतात. त्याचवेळी धो-धो पाऊस कोसळतो. काही वेळाने हे काळेकुट्ट ढग मुंबईच्या आकाशातून गायब होतात आणि पुन्हा प्रकाशाने लख्खं मुंबई स्पष्ट दिसू लागते.
राज्यात 4 दिवस मुसळधार
दरम्यान चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होण्याची दाट शक्यता आहे.
असा असेल पावसाचा अंदाज
8 सप्टेंबर : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.
9 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट
10 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
11 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.






