Mumbai

Mumbai Diary:सावधान..! अक्षय कुमार अभिनित स्पेशल 26 प्रमाणे लाखाचा दरोडा..!प्राप्तिकर अधिकारी म्हणून आले चोर..!

Mumbai Diary:सावधान..! अक्षय कुमार अभिनित स्पेशल 26 प्रमाणे लाखाचा दरोडा..!प्राप्तिकर अधिकारी म्हणून आले चोर..!

स्पेशल २६ या चित्रपटात दाखविल्याप्रणाणे प्राप्तिकर खात्याचे अधिकारी असल्याचे भासवून आठ जणांच्या पथकाने विक्रोळी येथील व्यावसायिकाच्या घरात छापा टाकला. केवळ एक लाखाचीच रोकड या तोतया अधिकाऱ्यांच्या हाती लागली. मात्र छापा टाकण्यासाठी आलेले अधिकारी बोगस असल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने विक्रोळी पार्कसाइट पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

विक्रोळी येथील एका टॉवरमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकाची पत्नी घरी असताना पाच जणांचे एक पथक घरी धडकले. प्राप्तिकर विभागातून आल्याचे सांगत त्यांनी आपल्याकडील ओळखपत्र दाखवले. घाबरलेल्या व्यावसायिकाच्या पत्नीने त्यांना घरात येऊ दिले. या पथकातील सर्वांनी घरातील कानाकोपरा पिंजून काढला. घरात त्यांना केवळ एक लाख रूपये मिळाली. ती रोख रक्कम घेऊन हे पथक निघून गेले. व्यावसायिकाच्या पत्नीने याबाबत त्यांना सांगितले. नोटीस किंवा अन्य काही कागदपत्रे न देता एक लाख रूपये घेऊन गेल्याने व्यावसायिकाला संशय आला. त्यानंतर व्यावसायिकाने पार्कसाइट पोलिस ठाण्यात तक्रार केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनीत कदम आणि उपनिरीक्षक मिलिंद बनसोडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी धीरज कांबळे, प्रशांत भटनागर, वसीम कुरेशी आणि एजाज अशा चार जणांना अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह इतर तिघांचा शोध पोलिस घेत आहेत.

आरोपीच्या बहिणीने दिली माहिती

आरोपींपैकी एकाची बहिण व्यावसायिकाकडे घरकामाला होती. तिने मालक खूप श्रीमंत असून त्यांच्याकडे कायम पैसे असल्याची माहीती दिली. बहिणीने दिलेल्या माहितीच्या आधारे भावाला प्राप्तिकर अधिकारी बनण्याची कल्पना सुचली. त्याने इतर साथीदारांना सोबत घेऊन खोटी धाड टाकण्याचा कट रचल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button