Asia Cup 2022 Live:भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय..5 गडी राखत पाकिस्तानला नमवल..
आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा भारत-पाक सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखलं. तर भारताची स्थिती बिकट झालेली असताना त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा केल्या.
सलामीला आलेला केएल राहुल गोल्डन डकवर बाद झाला. पहिल्याच षटकात राहुल शून्यावर बाद झाल्यामुळे संघावर दबाव वाढला. पुढे विराट कोहली-रोहित शर्मा या जोडीने मोठे फटके मारत संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले. या दोघांनी ४९ धावांची भागिदारी केली. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा (१२) स्वस्तात बाद झाला. विराट कोहलीनं संघाची जबाबदारी स्वीकारत ३४ चेंडूंमध्ये तीन चौकार आणइ एक षटकार लगावत ३५ धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोहम्मद नवाझने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला. पुढे रविंद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने संयमी खेळ करत ३६ धावांची भागिदारी केली.
सूर्यकुमार यादवने १८ चेंडूमध्ये १८ धावा केल्या. नशीम शाहच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर रविंद्र जाडेजा (३५) आणि हार्दिक पांड्या यांनी संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले.
गोलंदाजी विभागात भारताच्या भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या तसेच अर्शदीप सिंह यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारने बाबर आजन, शादाब खान यांच्यासारख्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं. त्याने एकूण चार बळी घेत भारतासाठी विजयाचा पाया रचला. त्यानंतर हार्दिक पंड्यानेदेखील तीन गड्यांना तंबूत पाठवून पाकिस्तानी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलं.
भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या या जोडीला अर्शदीप सिंहने साथ देत दोन बळी घेतले. तसेच आवेश खाननेदेखील फकर झमन याफलंदाजाला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पाकिस्तानच्या संघाला १४७ धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान, पाकिस्तानचा संघ फलंदाजी विभाग चांगली कामगिरी करू शकला नाही. सलामीला आल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर ही जोडी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या षटकात बाबर आझम (१०) झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या ४२ धावा झालेल्या असताना दुसऱ्या विकेटसाठी आलेला फकर झमन (१०) आवेश खानच्या चेंडूवर झेलबाद झाला.
त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अहमद २८ धावा करून हार्दिक पंड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानतर मोहम्मद रिझवानने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ४३ धावांवर असताना हार्दिक पंड्याने त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र पाकचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.






