आरोग्याचा मुलमंत्र..केसांची निगा… टक्कला वर घरगुती उपाय
केस गळणे ही अनेकांची समस्या आहे. वाढते वय, मानसिक ताण, हार्मोन्सचे असंतुलन, पोषक तत्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणे आहेत. केस गळणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे; जूने केस गळतात आणि त्यांच्या जागेवर नवीन केस येतात. परंतू, जेंव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत, तेंव्हा ती एक समस्या होऊन बसते. अशा केस गळतीची परिणती बहुतेक वेळा टक्कल (baldness) पडण्यामध्ये होते, ज्याला अँड्रोजेनेटिक अलोपेशिया (androgenetic alopecia) असेही म्हणतात.
टक्कल दूर करण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करू शकता. यातील पहिली पद्धत आहे डोक्यावर जैतूनचे तेल लावणे. जैतूनचे तेल म्हणजेच ओलिव्ह ऑईल घेऊन ते कोमट होईपर्यंत थोडे तपावे आणि त्यात एक चमचा मध टाकून व एक चमचा कडूनिंबाचे तेल टाकून मिक्स करावे. हे मिश्रण नंतर डोक्यावर लावावे आणि 20 ते 25 मिनिटांनी केस धुवून घ्यावे. आठवड्यातून दोन वेळा तरी हा उपाय करावा यामुळे चांगले परिणाम काही दिवसांत दिसू लागतील.
कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल केसांसाठी वरदान आहे. जेव्हा तुमच्या केसांवरचे टक्कल वाढू लागेल तेव्हा तुम्ही एरंडेलचे तेल योग्य प्रमाणात घेऊन त्यात सम प्रमाणात नारळ आणि आवळा तेल मिक्स करून हे तेल केसांना आणि डोक्याला लावावे दर दिवशी रात्री झोपण्याआधी डोक्यावर हे तेल लावून सकाळी उठून शॅम्पू करावा. जर रोज हा उपाय करणे शक्य नसेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करावा .तुम्हाला महिन्याभरात या उपायाने फरक दिसून येऊ शकतो.
डोक्यावर ज्या जागीचे केस झडत असतील त्या जागी एका दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू लावावा. असे केल्याने केसांची ग्रोथ पुन्हा सुरु होते. डोक्यावर पूर्ण टक्कल पडले तरी तुम्ही हा उपाय वापरू शकता. प्रत्येक वेळी लिंबू लावल्यानंतर केस धुवायलाच हवे असे काही नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा तुमचे केस धुवू शकता. पण प्रत्येक दिवशी अंघोळीच्या आधी केसांना लिंबू रस लावल्याने खूप जास्त फायदा होऊ शकतो. जाणकार सुद्धा हा एक प्रभावी उपाय असल्याचे सांगतात.
डॉ किशोर बालासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ






