भाजपाचे निष्ठावंत नेते लक्ष्मण सावजी
विजय कानडे
नाशिक महानगर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा मोठा विस्तार झाला आहे यासाठी ज्यांनी कष्ट उपसले त्यात प्रदेश पॅनलिस्ट आणि राज्यातील भवन निर्माणची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते लक्ष्मण सावजी यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल त्यांचे जीवन जणू एक संघर्षगाथाच आहे.पेपर विक्रेता ते भाजपचे प्रदेश पॅनलिस्ट पदापर्यंत त्यांनी घेतलेली झेप सर्वांसाठी प्रेरणादायीच आहे.सर्वच विषयांत पारंगत असलेला उत्कृष्ट वक्ता,हसतमुख चेहेरा,सर्वांशी आपुलकीने वागणे आणि सर्वांच्याच मदतीला धावून जाणे आदी गुणांमुळे ते सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनले आहेत असे म्हटलं तर तर ते वावगं ठरणार नाही.ओघवती वाणी आणि स्पष्ट उच्चार यामुळे त्यांचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते सुसंस्कृतपणा आणि परखडपणा हे त्यांचे गुणही सर्वाना भावतात 5 ऑगस्टला त्यांच्या वयाला 62वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या जीवनाचा परिचय करून देणारा हा लेख
सोलापूर जिल्ह्यातील एक तरुण पाच दशकांपूर्वी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने नाशकात आला आणि संघर्षावर मात करून त्याने आज राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा जो ठसा उमटविला ते आपणास कदाचित अविश्वसनीय वाटत असले तरी ते कटूसत्य आहे लक्ष्मण वासुदेव सावजी हे त्याचे नाव.ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रातंजन हे त्यांचे मूळ गाव. सात भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा मोठा प्रपंच. वडील शेतकरी होते प्रपंचाचा गाडा हाकतांना त्यांना कसरत करावी लागायची.ग्रामीण भागात त्याकाळी उद्योगधंदेही नव्हते त्यामुळे लोक शहरांची वाट धरायचे.सावजींच्या बाबतीतही तसेच घडले त्यांचे मोठे बंधू विजय सावजी 1955मध्ये नाशकात आले आणि तेथे ते स्थिरावले.त्यानंतर एकेक करून उर्वरित सर्व भाऊ नाशकात आले. लक्ष्मणराव नाशकात आले तेव्हा ते फक्त 11 वर्षांचे होते. प्रपंचाला हातभार लावण्यास ते पेपर विकू लागले लॉटरीची तिकिटेही रस्त्यावर ओरडून विकत दिवाळीच्या काळात उटणे आणि फटाके विक्रीचा व्यवसायही ते करीत.त्याचा फायदा त्यांना जनसंपर्कवाढीसाठी झाला. कष्टाची कामे करताना त्यांनी शिक्षणही सुरू ठेवले न्यू हायस्कूल(आताचे बिटको हायस्कूल)मध्ये त्यांचे मध्यमिक शिक्षण झाले नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला होता.त्यांना राजकीय आणि सामाजिक शिक्षणाचे खरे धडे नाशकातच मिळाले. 1971साली ते रा.स्व.संघाच्या शाखेशी जोडले गेले आणि त्यानंतर संघ,जनसंघ आणि भाजपा परिवाराशी त्यांचे असलेले घट्ट नाते आजतागायत कायम आहे.संघामुळे वरिष्ठांचा सहवास त्यांना लाभला.संघ आणि जनसंघाचे विचार पटल्याने प्रत्येक उपक्रमात ते भाग घेऊ लागले. 1974साली नाशकात नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक झाली त्यावेळी जनसंघाचे उमेदवार दादासाहेब वडनगरे यांचा त्यांनी प्रचार केला. आणीबाणीच्या काळात शहरात फलक लिहून तसेच पेपर विक्रीच्या माध्यमातून शक्य ती मदत करून त्यांनी संघ परिवाराची मने जिंकली होती. त्यांच्यातील नेतृत्वगुणाला येथूनच खऱ्याअर्थाने बळकटी मिळाली.1977 आणि 1980च्या लोकसभा आणि 1978 व 1980च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केले.
1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यांच्यावर जिल्हा युवा मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याकाळात भाजपाची पक्षबांधणी म्हणजे अवघड काम होते. पक्षात कुणी येण्यास धजावत नव्हते. परंतु अशा परिस्थितीतही भाजपचा प्रचार आणि प्रसार करण्यात इतरांबरोबर सावजी आघाडीवर राहिले. त्याचे फळ लगेचच 1985ला मिळाले. नाशकातून डॉ.दौलतराव आहेर यांच्या रुपाने भाजपला पहिला आमदार लाभला. याचवेळी देवळालीतून भिकचंद दोंदे तर चांदवडमधून जयचंद कासलीवाल यांनीसुद्धा भाजपाचे आमदार म्हणून म्हणून विधानसभेत एन्ट्री केली. खऱ्या अर्थाने भाजपला सुगीचे दिवस येथूनच आले.यानंतर नाशिक विधानसभा मतदारसंघाचा गड भाजपने 2004पर्यंत कायम राखला. 1990 ते 1995 या पाच वर्षांचा गणपतराव काठे यांचा काळ वगळला तर उर्वरित कालावधीत दौलतराव आहेर यांनीच नाशिक विधानसभा मतदारसंघावर आपले अधिराज्य गाजविले. दरम्यान 1989 ते 1991पर्यंत भाजपचे पहिले खासदार होण्याचा बहुमानही डॉ.आहेर याना लाभला हे विशेष.या काळात सावजी यांचे भाजपातील महत्व हळूहळू वाढू लागले होते. पक्षातील महत्वाची पदे भूषविण्याची संधीही त्यांना मिळाली.10वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर 1992मध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सावजी यांना त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून वार्ड क्र.30 मधून उमेदवारी मिळाली आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते निवडून आले. नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य या नात्याने त्यांनी आपली चांगली छाप पाडली होती. त्याकाळात विजय साने आणि प्रा.सुहास फरांदे हेही भाजपातर्फे निवडून आले होते. ही त्रिमूर्ती सभागृह गाजवित.त्यांच्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात.1995मध्ये राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. नाशिकला प्रथमच चार मंत्रीपदे मिळाली होती. भाजपातर्फे डॉ.दौलतराव आहेर आणि ए.टी. पवार तर शिवसेनेतर्फे बबनराव घोलप याना कॅबिनेटचा दर्जा मिळाला आणि नंतर दिघोळेसेनेचे तुकाराम दिघोळे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. नाशिकसाठी राजकीयदृष्ट्या हा काळ सुगीचाच होता.सावजी यांना पण या काळात राज्यपातळीवरील म्हणजे रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे सदस्य हे महत्वाचे पद भूषविण्याची संधी शांताराम नांदगावकर आणि प्रभाकर पणशीकर यांच्या नेतृत्वाखाली मिळाली. आपल्या आयुष्यातील ते सर्वोच्च पदच होते. पुरुषोत्तम दारव्हेकर, वीणा देव,राम जाधव, ललिता बापट,जगदीश खेबुडकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांबरोबर काम करता आले हे मी माझे भाग्यच समजतो,असे सावजी म्हणतात.
1999साली लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्र निवडणुका झाल्या. त्यात नाशिक विधानसभा मतदार संघातून भाजपचे डॉ.आहेर पुन्हा निवडून आले तर लोकसभेसाठी युतीचे ॲड. उत्तमराव ढिकले विजयी झाले. तत्पूर्वी 1986,1992मध्ये विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे प्रा.ना.स. फरांदे तर नंतर 1998साली याच मतदार संघातून प्रतापदादा सोनवणे निवडून आले होते. प्रतापदादा यांनी 2004 च्या निवडणुकीतही नंतर हा गड कायम राखला होता. 1985नंतर भाजपला नाशकात चांगले दिवस आले आणि याला पक्षाचे उत्कृष्ट नियोजन आणि मजबूत पक्षबांधणी या गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत असे सावजींचे म्हणणे आहे. 2004 ते 2014हा दहा वर्षांच्या काळ भाजपासाठी केंद्र आणि राज्याच्यादृष्टीने अत्यंत कठीण गेला. मात्र या काळात जनतेचे प्रश्न हाती घेऊन विविध आंदोलने केल्याने भाजपाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते आणि त्याचेच फळ म्हणून 2014च्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी भाजपाचे चक्क तीन उमेदवार बाळासाहेब सानप, प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे यांना निवडून देऊन इतिहास घडविला. 2019च्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली.सौ.फरांदे आणि सौ.हिरे यानी आपली जागा कायम राखली तर नाशिकपूर्वमधून यावेळी भाजपातर्फे एड.राहुल ढिकले विजयी झाले. निवडणुकीपूर्वी केलेली सक्षम बूथरचना आणि इतर राजकीय पक्षातील दिग्गज लोकांना पक्षात आणण्यात आलेले यश आणि मोदी यांचा करिश्मा यामुळेच हे शक्य झाले असे सावजी गौरवाने सांगतात. नाशकांतील भाजपाचे चाणक्य अशी सावजी यांची ओळख आहे. एकदा एखादी गोष्ट त्यांनी ठरवली की ती तडीस नेल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. भाजयुमो शहर चिटणीस पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि नंतर जिल्हा सरचिटणीस, शहर सरचिटणीस आणि नंतर 2010 ते 2016पर्यंत सलग दोनवेळा महानगर अध्यक्ष, प्रदेश चिटणीस,प्रदेश प्रवक्ता तसेच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. नाशिक महानगरासह जिल्ह्यात भाजपाची भरभराट करणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते डावपेच आखतात यातच त्यांची खरी चतुराई दिसून येते. 2012साली महापालिकेत मनसेने 40 जागा जिंकल्या आणि त्यांना सत्तेसाठी युतीची गरज भासली तेव्हा शिवसेनेसह त्या सत्तेत सामील व्हावे अशी सावजींची इच्छा होती. मात्र शिवसेनेने त्यास प्रतिसाद न दिल्याने भाजपा मनसेला साथ देईल असा धाडसी निर्णय महानगर अध्यक्ष या नात्याने घेऊन सावजींनी सर्वांना चकित केले होते. त्यांच्या या धाडसाचे सर्व थरातून कौतुकही झाले. नंतर अडीच वर्षांनी मनसेने भाजपला महापौरपद देण्याचा शब्द पाळला नाही तेव्हा त्या पक्षाबरोबरची युती तोडून आम्ही सत्तेचे भुकेलो नाहीत हेसुद्धा त्यांनी दाखवून दिले होते. 2017ची महापालिका निवडणूक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. भाजपाने 66 जागा जिंकून महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. या विजयात सावजींचे योगदान मोलाचे राहिले हे विसरून चालणार नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः नंदुरबार मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती.ती यशस्वीपणे पार पाडून त्यांनी श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविला.आता 2019च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांची भूमिका मोलाची राहिली.आता होऊ घातलेल्या 2022च्या महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाला पुन्हा सत्ता मिळावी यासाठी सावजी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या अधिपत्याखालीच रणनिती आखली जात आहे.मविआ सरकार जाऊन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उल्हासचे वातावरण आहे सावजींचे मार्गदर्शन म्हणजे उपस्थितांसाठी एकप्रकारे पर्वणीच असते आपणास अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, जगन्नाथ जोशी, रामभाऊ म्हाळगी, वसंतराव भागवत,प्रकाश जावड़ेकर, धरमचंद चोरडिया, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या महान लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. स्थानिक पातळीवर दादासाहेब वडनगरे, बिरदीचंद नहार, पोपटराव हिरे, डॉ.दत्तात्रेय डोंगरे, बंडोपंत जोशी, गणपतराव काठे, डॉ.दौलतराव आहेर, नितीनभाई जोशी आदी दिग्गजांचे सतत मार्गदर्शन लाभले. या शिदोरीच्या जोरावरच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपण मोठी झेप घेऊ शकलो असे सावजी म्हणतात. 2014पासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या रुपाने दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभलेआहे. शाश्वत विचाराने प्रेरित होऊन हे सरकार काम करीत आहेत. जगाच्या कल्याणाचा विचार या विचारसरणीत असल्याने दीर्घकाळ है सरकार चालावे यासाठी आपण प्रयत्न करू असे सावजी म्हणतात.
रा.स्व.संघ, जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपा या सर्व घटकांशी परिचित असलेले सावजी यांचे वाचन दांडगे आहे. कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाही. आजही पक्षासाठी ते मोठ्याप्रमाणात वेळ देतात. त्यांच्याकडून शिकायला मिळते म्हणून कार्यकर्ते आणि नेते त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. त्यांचे भाषण मुद्देसुद असते. ते शिस्तीचे भोक्ते आहेत. कुणी चुकला तर जागेवरच त्याला ते त्यांच्या खास शैलीत ठणकावतात. त्यांच्या रागावण्यातही एकप्रकारे तळमळच दिसून येते. त्यांच्या कार्याची दखल म्हणूनच प्रदेश भाजपाने राज्यभरातील कार्यालय निर्माणची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून एकप्रकारे त्यांच्या कार्याचा गौरवच केला आहे.
सावजींचा 5 ऑगस्टला वाढदिवस आहे. 2019साली 5 ऑगस्टला घटनेचे 370वे कलम रद्द झाले होते आणि देशभर समाधानाची एक लाट पसरली होती. 2020मध्ये 5 ऑगस्टला अयोध्येत आणि संपूर्ण देशभरात एकप्रकारे दिवाळीच साजरी झाली कारण श्रीरामजन्मभूमी या ऐतिहासिक लढ्याची परिणती भव्य मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात त्या दिवशी झाली.5 ऑगस्ट 2021ला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताने हॉकीत 41 वर्षानंतर कांस्य पदक पटकावून इतिहास घडविला. सावजी यांचा जन्मदिनांक आणि त्यांचे राष्ट्रीय विचाराला वाहून घेणे यांचा जणू घट्ट ऋणानुबंध असावा असे घटनाक्रमावरून निदर्शनास येते.यश आणि अपयशाच्या चढ़उतारात किंचितही विचलित न होता पक्षाचे, विचारप्रवाहाचे मूल्याधिष्टित महत्व जाणणारे आणि खंबीर कार्यकर्तेपण जपणारे नेते सावजी यांना 62व्या जन्मदिवसानिमित्त निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !






