अमळनेर: स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेल्या शहरात ठीक ठिकाणी अस्वच्छता..!पुरस्कार खरा की कागदावरचा..?
अमळनेर येथील नगर परिषदेच्या हद्दीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येते वास्तविक अमळनेर नगरपरिषदेला स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. सद्यस्थितीत शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिग, उकिरडे,साचलेले पाणी,डुकरे इ चे साम्राज्य आहे.त्यामुळे मिळालेला स्वच्छतेचा पुरस्कार हा खरा की कागदावरचा..?असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.सर्वत्र पसरलेल्या घाणी मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारितोषिक मिळविणार्या पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
या शहराला स्वछ शहर सुंदर शहर असल्याचा कागदोपत्री पुरस्कार पण मिळाला आहे अर्थात हा ही एक विक्रमच आहे ..!स्वच्छतेच्या नावाने बोंब असलेल्या अमळनेर नगरपरिषदेचे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष असून निव्वळ शो बाजी चालली आहे. अनेक कॉलनी परिसरात गटार काढणे, झाडू मारणे इ रोजची कामेही होताना दिसून येत नाही. औषध फवारणी,कीटक नाशक फवारणी वै करावयाची असते हे आमच्या अमळनेर नगरपरिषदेला माहीतच नाही..! गटार काढायची आहे तर फोन लावावा लागतो की गटार काढायला 6 महिन्यांपासून कोणी आलं नाही तर माणूस पाठवा..झाडायला कोणी येत नाही हो साहेब कोणाला तरी पाठवा..!दाबून कर वसूल करणारी ही नगरपरिषद नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न करता भलत्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहे. दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पुरविण्याकडे लक्ष दिले तर बरं होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
ढेकू रोड, पिंपळे रोड, बस स्थानक परिसर, हाशमजी प्रेमजी व्यापारी संकूल, बाजारपेठ, त्रिकोणी बाग, बालाजी पुरा आदी परिसरात विविध गल्लीबोळांमध्ये कचर्याचे ढिग जमा झाले आहेत. पालिकेने स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, मोजकेच लोक या घंटागाडीत कचरा टाकतात. अनेक नागरिक हे रस्त्यावरील उघड्या जागेवर कचरा टाकून मोकळे होतात. यासाठी नागरिकांध्ये जनजागृतीही होणे गरजेचे आहे.
पालिकेने स्वच्छता कर्मचार्यांचे पथक नेमून हे कचरा डेपो नाहिसे करण्याची मागणी नागरिकांकउून हेात आहे. बाजारपेठे बरोबरच गल्लोगल्लीत कॉलनी परिसरात मोकाट जनावरे ,डुकरांचा मुक्त संचार आहे. भाजीपाला बाजारात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, याचा त्रास व्यापार्यासंह नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.
शहरातील विविध भागातील अस्वच्छता, अतिक्रमण याबाबत कर्तव्यदक्ष मुख्याधिकार्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. बेमोसमी पावसाळा आणि त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा, सांडपाणी, तुंबलेल्या गटारींमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे साथींचे आजार वाढले आहेत. त्याच ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटने जागतिक संकट उभे ठाकले आहे. याबाबत प्रशासनाने सावध राहून उपाय योजना राबविणे आवश्यक आहे.
जीवन ज्योती कॉलनीत गेल्या महिन्याभरात 8 ते 10 डुकरे अकस्मात मेली आहेत. डुकरांवर रोग असून सतत अचानक मरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रार करून देखील यावर उपाय योजना झालेली नाही.






