का साजरा केला जातो 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन मौलाना आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त
भारत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. मौलाना आझाद हे कवी, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक होते. देशातील अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांचा पाया रचण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
आझाद यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. मौलाना अबुल कलाम आझाद 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. 2008 मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
देशाचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्यकाळात 1951 मध्ये देशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UG C) ची स्थापना झाली. यासोबतच एआयसीटीई सारख्या संस्थांच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे 22 फेब्रुवारी 1958 रोजी दिल्लीत निधन झाले. 1992 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना मरणोत्तर देण्यात आला.
मौलाना आझाद यांचे कार्य..
– मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. त्यांचे वडील मोहम्मद खैरुद्दीन हे एक मुस्लिम विद्वान होते.
– मौलाना आझाद यांचे पूर्ण नाव – मौलाना सैयद अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल-हुसैन असे होते.
– स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले. मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.
– मौलाना आझाद यांना आझाद या नावाने ओळखले जात होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला होता. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते.
– स्वातंत्र्योत्तर भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आझाद उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून गेले आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले.
– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या स्थापनेचं श्रेय मौलाना आझाद यांनाच दिलं जातं.
– त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी संगीत नाटक अकादमी (१९५३), साहित्य अकादमी (१९५४) आणि ललितकला अकादमी (१९५४) सारख्या संस्थांची देखील स्थापना केली.
स्वातंत्र्यलढ्यात योगदान
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील महत्त्वाचं योगदान दिलं आहे. शिक्षणतज्ञ, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी म्हणून त्यांनी काम केलं.भारताची शैक्षणिक संरचना सुधारण्यासाठी अबुल कलाम आझाद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपली स्वप्ने विचारांमध्ये बदलतात आणि विचारांचे परिणाम कृतीत होतात, असं अबुल कलाम आझाद म्हणायचे. कलाम यांनी देशातील शैक्षणिक स्थिती सुधारण्याचं स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यास सुरुवात
मौलाना अबुल कलाम आझाद यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेता तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.भारताच्या या महान सुपुत्राच्या भारतातील शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांची जयंती दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण म्हणून साजरा केला जाईल, असं मंत्रालयानं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या संस्थांची स्थापना
राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, असं मौलाना अबुल कलाम आझाद म्हणाले होते. ते शिक्षणमंत्री असताना भारतातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी खरगपूर, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, पहिली भारतीय विज्ञान संस्था यासारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांची स्थापना करण्यात आली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 1888 मध्ये सौदी अरेबियातील मक्का येथे झाला. विद्यार्थ्यांनी सर्जनशील असावे आणि वेगळा विचार केला पाहिजे असा त्यांचा नेहमीच आग्रह असे. “शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांमध्ये चौकस दृष्टिकोन, सर्जनशीलता, उद्योजकता आणि नैतिक नेतृत्वाची क्षमता निर्माण केली पाहिजे आणि त्यांचा आदर्श बनवलं पाहिजे.”, असं म्हटलं होतं.
स्त्री शिक्षणाचे समर्थक
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी महिलांचे सक्षमीकरण ही राष्ट्राच्या सुधारणेसाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण अट आहे, असे विचार मांडले होते. महिलांच्या सक्षमीकरणानेच समाज स्थिर होईल, असा त्यांचा विश्वास होता. 1949 मध्ये त्यांनी संविधान सभेत महिलांच्या शिक्षणाचा मुद्दा मांडला होता. कलाम यांनी ग्रामीण उच्च शिक्षण मंडळ, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर बेसिक एज्युकेशन आणि इतर संस्थांचीही पायाभरणी केली. कलाम यांचे भारताच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासातील योगदान सर्वांसाठी निश्चितचं प्रेरणादायी आहे.
11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्र, परिसंवाद, निबंध लेखन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.






