कृ ऊ बा समितीच्या पेट्रोलपंप भूमीपूजनाचा गाजावाजा…!शेतकऱ्यांना पेट्रोल कमी भावात मिळेल का..? शेतकरी हिताचे इतर कामे करा..!इति.. शेतकरी
अमळनेर येथे काल म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी मोठा गाजावाजा करत कु. ऊ. बा. समिती अमळनेर यांच्या पातोंडा येथील जागेत इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात मा. ना.गुलाबराव पाटील पालक मंत्री जळगाव, विद्यमान आमदार यांच्यासह आणि अनेक बड्या हस्ती यांनी उपस्थिती दिली होती. मार्केट सभापती मा. तिलोत्तमा ताई यांनी मोठा गाजा वाजा करून कार्यक्रम घडवला पण कु. ऊ. बा समिती पेट्रोल पंप ही सकल्पना फारशी यशस्वी होतांना कुठे आढळून येत नाही. संगमनेर सोडून बाकी ज्या ज्या ठिकाणी ही योजना राबवली गेली तेथे अपयशी ठरवून कृषी उत्पन्न बाजार समितीना प्रचंड नुकसान झाल्याचा इतिहास आहे. हा इतिहास कदाचित गल्ला भरू कार्यक्रम करण्याच्या नादात सभापती यांनी अभ्यासला नसावा.तसेच उदाहरणं म्हणून बाजूच्या जिल्ह्यातील मा. विजय नवल पाटील यांच्या साखर कारखान्याचा पेट्रोल पंप भग्न अवस्थेत उभा राहून अपयशाची जणू ग्वाहीच देतोय.
तसेच पेट्रोल पंप चालवण्या साठी कृषिउत्पन्न बाजार समिती च्या खात्यात कायम 35 लाख लोड घेण्यासाठी हवेत त्याची तरतूद कशी होणार हे काही कळाले नाही. ट्रेन स्टाफ प्रशिक्षित कर्मचारी वर्ग कसा उपलब्ध होईल..? पेट्रोल, डिझेल चोरी वा हिशोबाच्या पैश्यात तफावत आली तर जबाबदारी निश्चित कोणावर करणार? भरपाई कोठून होणार? कंपनी मार्केट ची जागा करारात दाबून बसेल? तोटा होत राहिला तर जमीन कंपनी कडुन कशी ताब्यातून मिळणार? पेट्रोल पंप व्यवसाय आता पहिल्या सारखा लभदायक राहिला नाही. पेट्रोल च्या वाढत्या किमती आणि व्यवस्थापन मेंटेनन्स यामुळे पेट्रोल पंप व्यवसायात नफा नाही अशी कितीतरी पेट्रोल पंप मालकांनी तक्रार केली आहे. हल्ली जागोजागी पेट्रोल पंप आलेत मग असा अचानक निर्णय घेण्याचे विद्यमान सभापतींना दिवा स्वप्न कसे पडले असेल?पर्यावरण संरक्षण,पेट्रोल आणि शेतकरी हित ह्या परस्पर भिन्न गोष्टी आहेत.
बाजार समितीच्या कामकाजात अनागोंदी, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. ‘शेतकरी हित’ केवळ नावाला असून गल्लेभरू धंदे या संस्थेतून अव्याहत सुरू आहेत. आमचे बापजादे व आता आमचे कोणाचेही हित या संस्थेच्या माध्यमातून आजतागायत साधले गेलेले नाही. पेट्रोल पंप टाकून शेतकरी हित साधले जाईल असे सांगणे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. केंद्र व राज्य शासनाकडून बाजार समितीत ज्या काही सेवासुविधा, सामुग्री मिळालेल्या आहेत त्या पूर्वप्रभावलक्षीपणे कार्यान्वित होणे आवश्यक आहे. पातोंडा येथे पेट्रोल पंप ऐवजी खरेदी-विक्री केंद्र सुरू झाल्यास शेतकर्यांना दिलासा मिळू शकतो. पेट्रोल पंपला जाहीर विरोध आहे.
– शाम साहेबराव सोनवणे शेतकरी, अमळगाव ता.अमळनेर जि.जळगाव
पातोंडा येथे बाजार समितीचे उप केंद्र स्थापना होऊन अनेक वर्ष झाली मात्र अद्यापावेतो खरेदी-विक्री सुरू न केल्याने हेतू मात्र साध्य झालेला नाही. त्या जागेवर आता पेट्रोल पंपसाठी आग्रह धरला जात आहे त्यातून शेतकरी हिताचा कोणाताच हेतू साध्य होत नाही. बाजार समितीत जबाबदारांचे व्यापार्यांवर नियंत्रण नसल्याने शेतकरी नाडला जातो, लुटला जातो. लक्षच द्यायचं असेल तर खरेदी-विक्रीवर लक्ष द्या, तुमच्या नियंत्रणात या गोष्टी झाल्या तर शेतकर्यांना दिलासा मिळेल. गाळणी-चाळणीसह विविध प्रकारची यंत्र सामुग्री धूळखात पडली असून ती कार्यान्वित करा, पातोंडा येथे खरेदी-विक्री केंद्र सुरू करा. शेतकर्यांचे खरे हित बांधकामात नसून ते कशात आहे हे जबाबदारांनी जोखावे, निव्वळ धूळफेक करू नये.
– विश्वास मोतीराम पवार, शेतकरी, अमळगाव ता.अमळनेर
अमळनेर येथील कृ ऊ बाजार समितीच्या आवारात गाळण आणि चाळणी मशीन अनेक दिवसांपासून बंद आहे.याच परिसरात अवैध गांजा विक्रेता उर्फ घोडेवाला राजरोसपणे गांजा विकतो आहे.ह्याचे बेकायदेशीर उत्पन्न कोणाच्या खिश्यात जाते..? त्याला कोणाचे अभय आहे..? त्याची चौकशी का केली जात नाही? हे कोणते शेतकरी हित आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याशिवाय कृ उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला देखील विकून टाकले आहे. तेथेही छोटे दुकान सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना अद्ययावत गोडाऊन ची नितांत गरज आहे. शेतकरी आपला माल शिरपूर धुळे येथे घेऊन जातात.ह्या सर्व पैसे खाऊ उठाठेवी करण्यापेक्षा एक अद्ययावत गोडाऊन देखील उभारले जाऊ शकते की जेणेकरून शेतकऱ्यांचा माल वेळ पैसा आणि श्रम वाचतील.पण हे केल्याने प्रशासक मंडळाचा फायदा होणार नाही म्हणून सदर प्रश्न निकालात काढले जात नाही अशी चर्चा गावात सुरू आहे.
आधी पावसाने दडी मारली त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.याबाबतीत लोकप्रतिनिधी उदासीन असून पेट्रोल पंप चे भूमिपूजन मात्र जोरात होते. भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल लोकप्रतिनिधींना काही पडलेली नाही असेही मत शेतकऱ्यांनी मांडले आहे.
Noc मिळवता मिळवता काय काय येते -जाते..? कसे येते जाते आणि मिळू शकते याचा विचार प्रखरतेने विद्यमान सभापती यांनी केलेला दिसतोय यात शंका दिसत नाही. तरी मा. सभापती आणि कु. ऊ. बा. अमळनेर यांचा पंप योग्य चालावा ह्याबाबत आमच्या शुभेच्छा.






