?आरोग्याचा मूलमंत्र..उच्च रक्तदाब..!लक्षणे आणि उपाय…
आज आपण उच्च रक्तदाब म्हणजे काय, तो कसा ओळखायचा आणि त्याला कसे हाताळायचे हे बघूया. आपला रक्तदाब सामान्यापेक्षा जास्त असेल आणि नेहमीच जास्त असेल तर त्याला आपण ‘उच्च रक्तदाब’ म्हणतो. सामान्य रक्तदाब हा 120 सिस्टोलिक आणि 80 डायस्टोलिक (१२०/८०) एवढा किंवा यापेक्षा कमी असतो. जर आपला रक्तदाब सतत १४० /९० यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. यासाठी डॉक्टर कमीत कमी दोन-तीन वेळा आपला रक्तदाब तपासून बघतात आणि आपल्या उच्च रक्तदाबाचे निदान करतात. रक्तदाब खूप जास्त वाढला असेल, तर लवकरसुद्धा निदान करता येते.
• तुम्हाला अनियंत्रित रक्तदाब असेल तर तुम्हाला खालील लक्षणे दिसतील:
तीव्र डोकेदुखी – तुम्हाला उच्च रक्तदाबामुळे डोक्यात जडपणा किंवा वेदना जाणवेल.
थकवा किंवा संभ्रम – तुम्हाला कमजोरी किंवा कणकण वाटेल किंवा संभ्रमाची जाणीव होईल.
दृष्टिदोष – तुम्ही दृष्टीतील अस्पष्टता किंवा दुहेरी दृष्टी अनुभवाल.
छातीतील दुखणे – तुम्हाला छातीत तीव्र वेदना किंवा भारीपणा जाणवेल.
श्वसनाचा त्रास – तुम्हाला जाणवेल कि तुम्हाला श्वास घेणे कठीण होत आहे.
घाबरल्यासारखे होणे – तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके जाणवतील.
लघवीत रक्त येणे – एखादवेळी लघवीचे गडद किंवा हलके तपकिरी रंगाचे होणे तुमच्या लक्ष्यात येईल.
काय काळजी घ्याल?
१. मीठ खाण्यावर नियंत्रण : उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांनी आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. याचा अर्थ असा नव्हे की, मीठ खाऊच नये किंवा अळणी जेवण खावे. खूप काळ साठवलेले अन्नपदार्थ, हॉटेलमध्ये तयार केलेले पदार्थ, कुरकुरे, चिप्स इत्यादी पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे.
२. ताज्या भाज्या व फळे : रोजच्या आहारात ताज्या भाज्या, फळे तसेच कमी स्निग्धता असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.
३. कडधान्ये : सर्व प्रकारच्या कडधान्यांचा डाएटरी फायबर्स हा मुख्य स्रोत असतो. कडधान्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
४. मासे : मासे खाणाऱ्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका शक्यतो उद् भवत नाही. मुख्यत्वे यासोबत वजन कमी केल्यास जास्त फायदा होतो.
५. कॉफी : कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त कप कॉफी प्याल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास संभवतो.
हे लक्षात ठेवा
१. मद्यपान : अतिमद्यपान म्हणजे उच्च रक्तदाबाला निमंत्रणच असते. अतिरिक्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याला हा धोका संभवतो.
२. वजन : स्थूलत्वामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार सहजतेने जवळ येतात. कमी व सकस अन्न खाणे, भरपूर व्यायाम करणे ही खरी वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे
३. नियमित व्यायाम : दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करायलाच हवा. चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग आदी व्यायाम करता येतील. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी वेट ट्रेनिंग करावे. नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल, तरी उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी तो फायदेशीर आहे हे लक्षात ठेवावे.
नियंत्रित आहार व आवश्यक व्यायाम करूनही उच्च रक्तदाब नियंत्रित होत नसेल, तर आपल्याला औषधोपचाराची गरज असते.
डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथिक तज्ञ)






