योगा : निरामय आरोग्याची संजीवनी – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : योग म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचे एकीकरण. आजच्या स्पर्धेच्या युगात अपयश, नैराश्य व नातेसंबंधांतील संघर्ष यामुळे आपल्यासमोर नवनवीन आव्हाने उभी राहिली आहेत. यासोबत शारीरिक व मानसिक सक्षमता कुठेतरी लोप पावत आहे अशा परिस्थितीत योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा अंगीकार केल्यास निरामय, आनंददायी व उत्साही जीवन पुनर्स्थापित होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला आपापल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान द्यावे असे आवाहन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.
ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालया च्या राष्ट्रीय छात्र सेना एकका च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ‘निरामय आरोग्यासाठी योगासने आणि प्राणायाम’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. आयुष मंत्रालय, दिल्ली, डी जी, एनसीसी दिल्ली व 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव यांच्या निर्देशानुसार समादेशक अधिकारी 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव, कर्नल प्रवीण धिमन व प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककाचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी स्वतः सहित कॅडेटस सोबत योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. आयुष मंत्रालय दिल्ली च्या निर्देशानुसार ‘बी विथ योगा, बी एट होम’ या सूत्रानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावा च्या पार्श्वभूमीवर सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी योगा म्हणजे काय ?, योगा चे शारीरिक व मानसिक फायदे यासोबत दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असे योगासने आणि प्राणायाम या विषयी सखोल माहिती दिली.
यावेळी उपस्थित कडेटसने आपापल्या घरी कुटुंबासोबत विविध योगासने करून योगाला आपल्या दैनंदिन जीवनात विशेष स्थान देऊ अशी शपथ घेतली. कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने अवघे विश्व संकटाच्या छायेत असतांना प्रत्येकाचीच शारीरिक आणि मानसिक शक्ती वर्धन करण्यासाठी योगा अत्यंत उपयुक्त आहे असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.
या वेबिनार च्या यशस्वी आयोजनासाठी कर्नल प्रवीण धिमन, प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सुभेदार मेजर कोमल सिंग, सुभेदार जयपाल सिंग, सुभेदार अजित सिंग, लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कडेट्सने मार्गदर्शन आणि सहकार्य केले.






