सुरगाणा संस्थानचा गौरवशाली इतिहास ; विजय कानडे
नाशिक : ‘सुरगाणा’ हे शंकराच्या १००८ नामावलींपैकी एक नांव आहे. त्याचा अर्थ साक्षात शंकरदेव जिथे इतर देव व गणांसोबत वास्तव्य करीत असत, त्या जागेला ‘सुरगणा’ असे म्हणतात.या नावावरूनंच संस्थानला ‘सुरगाणा संस्थान’ असे नाव पडले. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तश्रृंगी देवी या घराण्याची कुलस्वामीनी आहे.प्राचीन काळापासूनच सुरगाणा राजघराणे सप्तशृंगी देवीचे दास/सेवक होते त्यामुळेच मोघल साम्राज्याकडून होणाऱ्या आक्रमणापासून गडाच्या संरक्षणाची जबाबदारी राजघराण्याकडे होती. त्याचप्रमाणे गडाचा जिर्णोद्धार आणि देवीची पूजा-अर्चा नित्यनेमाने सुरगाणा राजघराण्याकडून होत असे.
श्रीमंत राजे पवार यांचे ‘सुरगाणा संस्थान’ प्राचीन असून संस्थानचे
प्रमुख असलेले ‘पवार राजघराणे’ क्षत्रिय कुलोत्पन्न आहे. त्यांना देशमुख ही राज्याभिषेकी पदवी होती. ‘देश’ म्हणजे ‘वतन’ आणि ‘मुख’ म्हणजे ‘तोंड’, जो राजा आपल्या देशासाठी, वतनाच्या हितासाटी व संरक्षणासाठी नेहमी पुढे उभा राहतात,त्यास ‘देशमुख’ म्हणतात. त्याचप्रमाणे सुरगाणा महाराजांना ‘साहेब मुस्फत’, ‘कदरदान’, ‘मेहरबान’, ‘करम फर्माये दोस्तान’ असे मानाने दरबारी संबोधले जाई.
महापराक्रमी व गौरवशाली वारसा असणारे ‘पवार घराणे’ राजस्थानमधील माऊंट आबू या पर्वतराजींतील वशिष्ठ मुनींच्या गोत्रामधील ‘राजपूत परमार’ घराण्याचे वंशज आहेत. तेराव्या शतकाच्या सुमारास ते माळवा/ धारानगरी प्रांतामधून सुरगाणा येथे आले व आपल्या पराकमाच्या जोरावर सुरगाणा संस्थानाची स्थापना केली. हे संस्थान पुर्वीपासूनच स्वतंत्र वृत्तीचे व अत्यंत जाज्वल्य वारसा असणारे होते. संपुर्ण भारतातील ‘सुरगाणा संस्थान’ हे एकमेव असे संस्थान आहे जे दुसऱ्या कोणत्याही मोगल, मराठा व ब्रिटिश साम्राज्याला मान्यता देत नव्हते तसेच ईतर कोणत्याही संस्थानांना नजराणा भरत नसे, त्यामुळे त्यास ”बंदे मुल्क”(Rebel Lord) असे म्हटले जाई.
सुरगाणा संस्थानाच्या एका बाजूला सह्याद्रीची नैसर्गिक अभेद्य तटबंदी असून दुसऱ्या बाजूला अरंदवना पर्वतरांग असल्याने सुरगाणा ला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे.सुरगाणाच्या एका बाजूला ‘धरमपूर’ व ‘बांझदा’ ही दोन संस्थाने होती.’धरमपूर संस्थान’ हे ‘उदयपूर संस्थांनची’ शाखा असून त्यांचे संस्थानिक महाराणा प्रताप सिंह राजेंचे वंशज होते. त्याचप्रमाणे ‘बांझदा संस्थान’ हे प्राचीन सोलंकी वंशाचे राजेघराणे होते.
सुरगाणाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या डांग परिसरातील चौदा संस्थानांच्या संरक्षणाची जबाबदारी(मिलिटरी सर्व्हिस) सुरगाणा संस्थान घेत होते, त्याबदल्यात ही चौदा संस्थाने प्रतिवर्षी सुरगाणा दरबारात मानाचा नजराणा भरत असत.डांग प्रदेशात मोगल सैन्य आक्रमण करून, त्यांच्यावर जुलूम-जबरदस्ती करत व त्यांना ईस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत,अश्यावेळी सुरगाणा महाराजांकडून कडून त्यांना पूर्ण संरक्षण दिले गेले आणि हिंदू धर्म जपला गेला.त्यामुळेच सुरगाणा संस्थानावर होणाऱ्या परकीय आक्रमणाच्या विरोधात ही सारी संस्थाने सुरगाणा संस्थान सोबत कायम उभी राहत.दख्खनमधून उत्तरेत जाणारा अत्यंत महत्वाचा राजमार्ग (स्ट्रॅटेजीक लोकेशन) सुरगाणा संस्थानातील हदगड किल्ल्याजवळून जात होता. तेथून जाण्या-येण्यासाठी सुरगाणा महाराजांची परवानगी घ्यावी लागे व त्याचा नजराणा सुरगाणा दरबारात भरला जाई. पेशव्यांना उत्तर कोकणातील जव्हार पासून दिव दमण, वलसाड ते सुरत पर्यंतचा समुद्र किनारा स्वतःच्या अधिपत्याखाली पाहिजे होता कारण परदेशातून आयात होणारा माल या समुद्र किनाऱ्यावरील बंदरा मध्ये उतरवला जात असे, त्यामुळे तेथील महसुलावर पेशव्यांचा डोळा होता परंतू पेशव्यांच्या या मनसुब्याला सुरगाणा संस्थान दाद देत नव्हते म्हणून सन 1758 मध्ये पेशवे बाळाजी बाजीराव यांनी सुरगाणा संस्थान बरोबर युद्ध पुकारले, परंतू या युद्धामध्ये सुरगाणा संस्थानने धरमपुर ( रामनगर), जव्हार, मांडवी, पेठ तसेच दीव दमणचे पोर्तगिज यांच्याशी संधान बांधून पेशव्यांचा पराभव केला.
पुन्हा सन 1765 मध्ये पेशवे रघुनाथराव यांनी मुघल सरदार डोंगर खान यांच्या बरोबर करार केला की सुरगाणा संस्थान जिंकल्यावर त्याचा अर्धा भाग देण्यात येईल, म्हणून डोंगर खान नी सुरगाणा संस्थान वर आक्रमण केले परंतू सुरगाणा संस्थानने डोंगर खानचे आक्रमण मोडून काढले व पेशव्यांचा मनसुबा पुन्हा एकदा धुळीस मिळवला.
१८६० च्या सुमारास ‘सुरगाणा संस्थान’ व ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या
सैन्यात चकमकी सुरू झाल्या परंतू ब्रिटीश सैन्याचे प्रत्येक आघाडीवर होणारे नुकसान टाळण्यासाठी इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांनी सुरगाणा संस्थानच्या महाराजांबरोबर मैत्रीच्या प्रस्तावाची सनद केली व सुरगाणा महाराजांना वेस्ट मिनिस्टर्स अॅबे (ब्रिटिश राणीचा दरबार) येथून ‘ड्रेस ऑफ ऑनर’ हा मानाचा राज पोशाख ब्रिटिशांच्या भारतीय व्हाईसरॉयच्या मार्फत मुंबई प्रांताच्या गव्हर्नरकडून प्रतिवर्षी सुरगाणा दरबारात येवून देण्याची प्रथा सुरू केली.
१९४७ साली हे संस्थान भारतीय गणराज्यात समाविष्ठ झाले त्यावेळी श्रीमंत महाराज धैर्यशीलराव यंशवतराव देशमुख पवार हे गादीवर होते आता त्यांचे वंशज श्रीमंत महाराज कुमार रोहितराजे देशमुख पवार हे आहेत. महाराज कुमार श्रीमंत रोहितराजे यांना लहापणापासूनच त्यांच्यावर झालेल्या राजघराण्याच्या संस्कारामुळे पूजापाठ करणे, वेद, पुराण, भगवद्गीता या धार्मिक बाबींमध्ये अत्यंत रुची आहे, त्यामुळे त्यांनी आधुनिक विज्ञान व पारंपरिक धर्म या दोघांमध्ये सुंदर समन्वय साधण्याची कला अवगत केली आहे, सध्या ही, ध्यान धारणा करणे हे त्यांच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनले आहे. त्यांचे हायस्कूलचे शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल व फर्वशी अकॅडमी नाशिक येथे झाले त्यानंतर त्यांनी पुणे येथील सिम्बायोसिस कॉलेज मधून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली व त्याच कॉलेज मधून MBA IN MARKETING AND HUMAN RESOURCE MANAGEMENT मधून उच्च शिक्षण प्राप्त केले, तसेच ते विविध कोर्सस साठी परदेशात जाऊन आलेले आहेत. मोठ्या राज घराण्यातून येऊन सुद्धा त्यांनी अनुभवकामी प्रथम अनेक वर्षे एचडीएफसी बँक येथे व नंतर MIT COLLEGE पुणे येथे Director Head Public Relation and Corporate Communication म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
सध्या ते Mind and Soul Science मध्ये प्रयोग करीत आहेत व त्यांचे अनेक शहरांमध्ये आवड म्हणून Classes घेत असतात, त्यांचे असे म्हणणे आहे आजच्या धकाधकीच्या युगात नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज आहे, सुरगाणा संस्थान मधील लोकांच्या मध्ये धर्म आणि संस्कृती बद्दल जाणीव निर्माण व्हावी व त्यांच्या जीवनात सुख, शांती, समाधान यावे व त्यांची प्रगती व्हावी यासाठी ते धडपड करत असतात त्यांचे असे म्हणणे आहे की मनुष्य जात हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे व यावर त्यांची अतूट श्रद्धा आहे.
याप्रमाणे सुरगाणा संस्थानचा हा संक्षिप्त इतिहास आहे.







