गदिमांची जन्मभूमी साहित्यीकांचे तीर्थक्षेत्र बनावे
आटपाडी प्रतिनिधी
जगभरातल्या माणदेशी आणि मराठी साहित्यीकांची पंढरी , तिर्थक्षेत्र म्हणूनच गदिमांची जन्मभूमी शेटफळे भविष्यात ओळखली जाण्यासाठी प्रत्येक माणदेशीनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग.दि. माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सादिक खाटीक (आटपाडी ) यांनी केले आहे .
महाकवी ग.दि . माडगूळकर यांच्या शंभरावा जयंतीदिन आणि जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमात ते शेटफळे येथे बोलत होते .
गदिमा साहित्याचे थोर अभ्यासक डॉ . श्रीपाद जोशी , निसर्ग आणि बालकवी सुभाष कवडे , प्रसिद्ध कवी सुरेशकुमार लोंढे , सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. कृष्णा इंगोले , प्रा . विश्वनाथ जाधव सर आटपाडी , कवी ज्ञानेश डोंगरे, शिवाजी बंडगर , मेघा पाटील , अनिता पाटील संयोजक प्रा.डॉ . सयाजीराजे मोकाशी , प्रा . चंद्रकांत गायकवाड , प्रा. संभाजीराव गायकवाड .पतंगराव गायकवाड, गुरुजी , वामनराव गायकवाड , हरीभाऊ गळवे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .
माणदेशातले लेखक , कवी , कथाकार , नाटककार, शाहीर , वगैरे साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी आपआपल्या घरात बचतीच्या डब्ब्यातून प्रतिदिनी काही रक्कम गोळा करून वर्षाकाठी ती स्मारक समितीच्या स्वाधीन केल्यास प्रतिवर्षी पाच ते दहा लाख रुपये पर्यत निधी गोळा होवू शकेल . येत्या दहा वर्षाच्या अशा उपक्रमातून समितीकडे जमणाऱ्या मोठ्या निधीच्या व्याजातून ही साहित्य पंढरी, साहित्यीकांचे तीर्थक्षेत्र माणदेशाचे पिढयान पिढयाचे शक्तीशाली साहित्य पीठ, तीर्थक्षेत्र ठरू शकेल . यासाठी प्रत्येकाने गदिमांची जन्मभूमी हीच माझी साहित्यीक जननी मानून या पीठासाठी, तीर्थक्षेत्रासाठी आपलेपणातून समर्पित व्हावे असे आवाहन ही सादिक खाटीक यांनी यावेळी केले .
प्रारंभी गदिमा पारावरील साहित्यीक मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर म्हणाले , माणदेशात पाण्याचा दुष्काळ असला तरी विचाराचा नक्कीच नाही. अलीकडे पाणी आणि निसर्गाचा दुष्काळ ही संपत चालला आहे. आता विचाराच्या समृद्धीची उंची आणखी वाढवण्याचे काम साहित्यिकांनी करावे,
प्रास्ताविक प्रा. सयाजीराजे मोकाशी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा . विजय शिंदे सर यांनी केले.
आमदार श्री. अनिल भाऊ बाबर पुढे म्हणाले,’ आचारसंहितेमुळे बोलण्यावर मर्यादा पडली आहे. निवडणुकीचा कालावधी असला तरी गदिमांची सुवर्ण महोत्सवी जयंतीही टाळण्यासारखी नक्कीच नाही. गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष अपेक्षित साजरे झाले नाही. आटपाडीत गदिमांच्या नावे नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य सरकारने 13 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. केवळ जागेचा ताबा मिळाला नसल्यामुळे पुढचे काम थांबले आहे’.
ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाद जोशी सर म्हणाले,’21 आणि 22 व्या शतकातही नॉनमॅट्रिक असलेल्या गदिमांचे साहित्य ,पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत. गदिमांनी बारा प्रकारात साहित्याचे लिखाण केले. ते माणदेशी बहुआयामी व्यक्तिमत्व होते. माणसांनी योग्यता , मेहनतीने मिळवायची असते. खरेतर माणदेशातील गदिमा हे वाल्मिकी जवळ पोहोचलेले लेखक आहेत .
करगणीचे साहित्यक बाबाखान दरवेशी अत्यंत प्रतिभाशाली साहित्यिक होऊन गेले.उमेदीत ते पुण्या-मुंबईला गेले असते तर कदाचित आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीतच त्यांचा आणि माणदेशाचा नावलौकिक झाला असता. त्यांच्या अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन करण्यासाठी समाजसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन प्राचार्य डाॅ. कृष्णा इंगोले यांनी केले.
‘माणदेशी साहित्य परंपरा आणि गदिमा’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात प्रा. विश्वनाथ जाधव आणि सुभाष कवडे यांनी सहभाग घेतला. डॉ. इंगोले म्हणाले,’ माणदेशात अनेक प्रतिभासंपन्न साहित्यिक होऊन गेले. यामध्ये करगणीचे बाबाखान दरवेशी यांचा वरचा क्रमाक लागतो. ते उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेले प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. त्यांनी अत्यंत सहज, सुलभ आणि सोप्या भाषेत पोवाडे, लावणी,साखी, कूट, ऐळीव असे अनेक प्रकार सहजतेने हाताळले. त्यांनी प्रचंड लेखन केले आणि गावोगावी जाऊन सादरीकरण केले. दुर्दैवाने त्यांचे साहित्य प्रकाशित झाले नाही. त्यांच्या साहित्याचे हस्तलिखित शेकडो पानी बाड आजही जसेच्या तसे सुरक्षित आहे. त्यांच्या काळात बाबाखान जर पुणे मुंबईला गेले असते तर कदाचित त्यांनी गदीमांच्या बरोबरीने माणदेशाचा नावलौकिक केला असता. त्यांचे प्रकाशित असलेले साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे’. सुभाष कवडे यांनी माणदेशातील कवी आणि त्यांच्या कवितेचा आढावा परिसंवादात मांडला. ते म्हणाले,’ माणदेशातील कवीनी अत्यंत सोप्या भाषेत जगण्याचे तत्वज्ञान कवितांमधून मांडले’. प्रा.विश्वनाथ जाधव यांनी माणदेशातील लेखक, कादंबरीकार आणि त्यांचे कथासंग्रह ,कादंबरी यांचा आढावा मांडला. परिसंवादात माणदेशात होऊन गेलेले साहित्यीक आणि त्यांचे साहित्य यावर चर्चा झाली.







