हेमंत नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस ? सुबोधकुमार जयस्वाल CISF च्या महासंचालकपदी वर्णी
मुंबई – महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल याबाबतच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत या नियुक्तीचा कार्यकाळ असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्या हाती सोपवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
सेवा ज्येष्ठत्वानुसार संजय पांडे हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत तर सुरेंद्र पांडेय हे १९८६ बॅचचे आहेत. तसेच नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पण राज्याच्या पोलीस महासंचालक पदाच्या स्पर्धेत नागराळे बाजी मारतील अशी चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेला काल पूर्णविराम लागला आहे. जयस्वाल यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. ती विनंती मान्य देखील करण्यात आली होती.
सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी वरिष्ठ आयपीएस आधिकारी मैदानात आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्र सरकारमध्ये होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक बनले होते. सुबोध जयस्वाल हे केंद्राच्या सेवेत गेल्यानंतर त्यांच्या जागी आता नवे महाराष्ट्र पोलीस महासंचालक येणार आहे. सुबोधकुमार कुमार जयस्वाल यांच्यानंतर वरिष्ठ असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम किंवा गृहनिर्माण पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र १९८७ बॅचमधील कनकरत्नम हे उद्या ३१ डिसेंबर २०२० रोजी निवृत्त होत आहेत. तर बिपीन बिहारी हे मार्च २०२१ मध्ये निवृत्त होत आहेत.
त्यामुळे राज्य सरकारला आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड, हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, लीगल अँड टेक्निकल, सुरेंद्र कुमार पांडे, महासंचालक, जेल विभाग, रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, एसीबी, महाराष्ट्र राज्य या चार अधिकाऱ्यांपैकी एकाची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करावी लागणार आहे.
हेमंत नगराळे याआधी होते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त
हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये प्रभात रंजन यांच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. आपल्या कारकीर्दीत नागराळे यांनी आयुक्तालयाचा कारभार उत्तम केला होता. मात्र, काही प्रकरणांमुळे त्यांचे नाव चर्चेतही होते. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची जूलै २०१८ साली बदली झाली असून त्यांच्या जागेवर संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. नागराळे यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला होता. त्यांनी आपले ‘वजन’ वापरून नवी मुंबईत ठाण मांडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत होती. आता ते राज्याच्या लीगल आणि टेक्निकल विभागाचे पोलीस महासंचालक पदी कार्यरत आहेत.






