?Crime Diary..मुंबईत 2 कोटीचे चरस जप्त, तिघांना अटक
मुंबईः खबरींकडून मिळालेल्या माहितीआधारे लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ६ किलो ६२८ ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या चरस या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी रुपये एवढी आहे. चरस तस्करी प्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली.
पकडलेले तिघेजण दिल्लीहून रेल्वेने मुंबईत आले होते. या तिघांना एका व्यक्तीने दिल्लीत चरसची पाकिटे दिली होती.
जप्त केलेले चरस पुररवणाऱ्या एजंटचा जम्मू काश्मीरमधील एका व्यक्तीशी संबंध आहे. जम्मू काश्मीरच्या व्यक्तीने चरस दिल्लीत पोहोचविण्याची व्यवस्था केली होती. दिल्लीच्या एजंटने तीन जणांच्या माध्यमातून चरसचा साठा मुंबईत पाठवला होता. मुंबईत हे चरस पुढे कोण ताब्यात घेणार होते तसेच या साठ्याचा आधीचा प्रवास या प्रकरणी तपास सुरू आहे.
याआधी मुंबई पोलिसांच्या कांदिवलीतील क्राइम ब्रँच युनिट अकराने खबरींनी दिलेल्या माहितीआधारे कारवाई करुन १.४० कोटी रुपयांचे एमडी हे ड्रग जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी चारजणांना अटक केली. अटक केलेल्या चौघांपैकी दोनजण विदेशी नागरिक आहेत.
पोलीस कांदिवली पश्चिमेच्या खजुरिया नगरमधील हालचालींवर लक्ष ठेवून होते. परिसरात गुरुवारी एक रिक्षा आली. रिक्षात दोन प्रवासी होते. रिक्षाच्या हालचालींवर एका दुचाकीवर बसलेल्या दोन जणांचे लक्ष होते. या दोघांनी वेगाने पुढे येऊन रिक्षाचालकाला थांबण्यासाठी खूण केली आणि रिक्षात बसलेल्या दोघांना ड्रगची पाकिटे दिली. हा व्यवहार सुरू असतानाच घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी सर्वांना अटक केली. या प्रकरणात
अटक केलेल्यांपैकी दोनजण विदेशी नागरिक आहेत. ते नालासोपारा येथे वास्तव्यास होते. पण घटनेच्या दिवशी डील करण्यासाठी आले होते. पकडलेले विदेशी नागरिक आफ्रिकेतल्या आयव्हरी कोस्ट या देशाचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी ७०० ग्रॅम एमडी जप्त केले. या ड्रगची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १.४० कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रग प्रकरणी पकडलेल्या चौघांची चौकशी सुरू आहे. सर्व आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जप्त केलेले मेफेड्रोन हे बंदी असलेले ड्रग आहे. हे ड्रग एमडी या नावानेही ओळखले जाते. एमडी हे एक सिंथेटिक ड्रग म्हणजे कृत्रिम अंमली पदार्थ आहे. या प्रकरणात स्थानिक कोर्टाने पकडलेल्या चारही आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलिसांनी पकडलेल्या चौघांपैकी एक आरोपी हिस्टरीशीटर आहे. त्याने आधी गंभीर गुन्हा केल्याची नोंद आढळली आहे. स्थानिक कोर्टाने या मुद्याची गंभीर दखल घेतली.
एमडी तस्करी प्रकरणी अटक केलेल्या चौघांपैकी विदेशी नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे. हे विदेशी नागरिक योग्य कागदपत्रांसह भारतात राहात होते की त्यांनी तस्करीसाठी देशात घुसखोरी केली आहे, याचा तपास सुरू आहे. याआधी विदेशी नागरिकांनी किती वेळा आणि कोणकोणत्या ड्रगची तस्करी केली याचाही शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. कांदिवलीत जप्त झालेले एमडी पुढे कोणाला पुरवण्याची योजना होती, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मागील काही दिवसांत मुंबईत ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तसेच पोलीस वारंवार कारवाई करत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवायांमुळे अनेक सेलिब्रेटी अडचणीत सापडले आहेत. आता एमडी आणि चरस जप्तीच्या ताज्या प्रकरणांमध्ये नवी कोणती माहिती हाती येते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.






