कोरोना काळातही जळगाव विद्यापीठाची परीक्षेसंबंधी अचुक नियोजन व यशस्वी अंमलबजावणी आदर्शवत
सलीम पिंजारी फैजपूर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विविध विद्याशाखांच्या तृतीय वर्ष पदवी व द्वितीय वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच इंजिनिअरिंग, फार्मसी, शिक्षणशास्त्र आदि शाखेतील शेवटच्या वर्षांच्या परीक्षांचे अचुक व प्रभावी नियोजन आणि परीक्षेसंबंधित सर्वच घटकांचे उचित कौशल्यपूर्ण वापराने अत्यंत यशस्वी अंमलबजावणी करून जळगाव विद्यापीठाने महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
कोरोना संक्रमणाच्या बिकट पार्श्वभूमीवर सर्वच विद्यापीठासमोर शेवटच्या वर्षाच्या परीक्षेसंबंधी यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. राज्य सरकार आणि यूजीसी यांच्यातील परीक्षेसंबंधी कोंडी न्यायालयाच्या निर्णयाने सोडवली जाऊन प्रत्येक विद्यापीठ ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेसंबंधी नियोजनात लागलेत. त्यात बऱ्याच अंशी सर्वच विद्यापीठांना अडचणींना सामोरे जावे लागले.
यादरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे मा कुलगुरू प्रा पी पी पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली परीक्षेसंबंधीच्या संपूर्ण टीमने अत्यंत काटेकोर नियोजन करून पारदर्शक व्यवस्था, सुलभ मार्गदर्शन, सक्रिय समन्वयकांची साखळी व ग्रामीण भागातील अत्यंत दुर्लभ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींना गृहीत धरून ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे.
यात जळगाव, धुळे आणि नंदुरबार सारख्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यामध्ये विखुरलेल्या विस्तीर्ण भागात सुद्धा अत्यंत बिकट परिस्थितीत परीक्षा उत्तम रीतीने पार पडीत असलेल्या परीक्षांचा आदर्श इतर विद्यापीठांनी घेण्यासारखा आहे. यासाठी मा कुलगुरू प्रा पी पी पाटील यांच्यापासून तर थेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक घटकाचे सहकार्य अत्यंत मोलाचे असून यामुळे आधीच विविध उपक्रमशील कार्यामुळे जळगाव विद्यापीठाचा संपूर्ण महाराष्ट्रात दरारा निर्माण झाला असून सद्यस्थितीतील परीक्षेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विद्यापीठाच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे परीक्षा देणारा विद्यार्थी ताणतणाव रहित व आनंदाने परीक्षा देत आहे. विद्यापीठाच्या कार्यकुशलतेमुळे समाजातील सर्वच घटकांच्या वतीने विद्यापीठाचे भरभरून कौतुक होत आहे.






