विरवाडे येथील जि.प. प्राथ. डिजिटल मॉडेल शाळेने दप्तराचे ओझेच होऊ नये यासाठी “दप्तरालय” हा एक अभिनव उपक्रम …….
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
विरवाडे येथील जि.प. प्राथ. डिजिटल मॉडेल शाळेने दप्तराचे ओझेच होऊ नये यासाठी “दप्तरालय” हा एक अभिनव उपक्रम राबवलाय. जिल्ह्यात अशा पध्दतीने उपक्रम राबवणारी ही पहिलीच शाळा आहे.
चोपडा (प्रतिनिधी):- इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची दप्तरे शाळेतच ठेवण्याची सोय व्यवस्थापनाने केली आहे. दप्तराचे ओझे होऊ नये, पावसाळ्यात पुस्तके भिजू नयेत यासाठी शाळेत वर्गनिहाय लोखंडी रॅक बनवलेत व त्यात विद्यार्थीनिहाय खाते बनवले आहेत आणि त्या खात्यांवर प्रत्येक विद्यार्थ्यांचे नाव व क्रमांक टाकले आहेत. प्रत्येक शाळेत शिक्षकांना शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकर असतात परंतु विदयार्थ्यांनाही त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी काहीतरी हवे यातूनच दप्तरालय या संकल्पनेचा उदय झाला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मा.गटशिक्षणाधिकारी सौ. भावनाताई भोसले व मा.केंद्रप्रमुख सौ.मिनाक्षीताई गाजरे यांनी विशेष कौतुक केले.
दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. सर्व विषयांची पुस्तके, तेवढयाच वह्या, चित्रकला, संगणक, प्रयोगवही,वर्कबुक, फॅन्सी वॉटर बॉटल, मोठा टिफीन , कंपास बॉक्स, डिक्शनरी , रायटिंग पॅड एवढ सगळं दप्तरात भरल्यावर नक्कीच वजन चार ते पाच किलोपेक्षा जास्त होते यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर त्याचा कणा आणखी वाकवतच आहे.
दप्तरालय सारखा उपक्रम राबवण्यासाठी शाळेला रावेर येथील श्री. प्रशांत कासार यांनी सामाजिक जाणिवेतून आणि त्यांच्या मातोश्री स्व. सौ. शोभाताई कासार ( शेटे ) यांच्या स्मरणार्थ शाळेला भरीव देणगी दिली.
” विनादप्तराची शाळा हा अत्यंत आनंददायी उपक्रम हाती घेतलाय , मुलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पाण्याच्या बाटलीचे वजन कमी करण्यासाठी शाळेत शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवलीय. विद्यार्थी आता स्वाध्यायानुसार पुस्तक व वही तेवढे घरी नेतात यामुळे दप्तराच्या ओझ्याचा अहवाल देताना वजन शून्यावर आले आहे. “
-श्रीमती मनिषा पाटील.
नवोपक्रमशील शिक्षिका.
” मुलांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्यासाठी सरकारने सातत्याने प्रयत्न केले , निर्णय घेतले , तरीही त्याला पूर्ण यश आले असे म्हणता येत नाही.बऱ्याचदा विद्यार्थी रोज बॅग भरण्याच्या कंटाळा करतात. सर्व वह्या , पुस्तके घेऊन जातात . पालकांनीसुद्धा स्पर्धेमागे न धावता मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करावा.सरकारी आदेशापलीकडे जाऊन विरवाडे येथील शाळेने “दप्तरालय ” सारखा उपक्रम राबवला तो इतरांनाही अनुकरणीय आहे. “
श्री. प्रशांत कासार







