गृहिणींनी दर्जेदार वेळ काढून स्वतःवर भरभरुन प्रेम करावे- अश्विनी शंकर जाधव
सलीम पिंजारी
संपूर्ण विश्वाला विनाशकारी गर्तेत ढकलणाऱ्या कोरोनाविषाणू मुळे प्रत्येकाला स्वतः शी सुसंवाद साधण्याची नामी संधी चालून आली आहे. मात्र घरातील कर्ते पुरुष व मुले नोकरी-व्यवसाय आणि शिक्षणात ऑनलाइन व्यस्त असतानाच घरातील गृहिणी मात्र आपल्याच लोकांसाठी अहोरात्र कामात व्यस्त असते. प्रत्येक गृहिणीने स्वतःसाठी दर्जेदार वेळ राखून ठेवावा, स्वतःच्या आवडीनिवडी यात रस घेऊन स्वतःसोबत सुसंवाद साधून शक्यतोवर घरातील कामांचे योग्य वाटप करून चिंता विरहित आयुष्य जगावे. जीवनावर शतदा प्रेम करून स्वतःसोबत परिवाराला आनंदी करावे असे मत अश्विनी शंकर जाधव, समुपदेशक, पोदार इंटरनॅशनल स्कूल, औरंगाबाद यांनी व्यक्त केले.
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल कॉलिटी अशुरन्स सेल (आय क्यू ए सी) आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना महामारीच्या काळातील स्त्रियांच्या मानसिक समस्या व उपाय’ या विषयावरती डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुसंवाद घडून आला.
या कार्यक्रमात रावेर व यावल तालुक्यातील 41 महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी तर प्रमुख पाहुणे सौ सोनाली राजपूत हे होते. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी सद्यस्थितीत प्रत्येकाची होणारी मानसिक घुसमट यावर सविस्तर विवेचन करून महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी च्या माध्यमातून गृहिणींच्या मानसिक समस्यांना वाचा फुटावी व त्यातून सुदृढ परिवार व सक्षम समाज निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सहभागी गृहिणींनी समुपदेशक अश्विनी जाधव यांच्याशी मुक्त संवाद साधत मनातील ताण हलका केला. आम्ही खरंच खूपच डिप्रेशनमध्ये होतो, स्वतःसाठी कधी विचारच करीत नव्हतो मात्र यापुढे घर सांभाळताना स्वतःसाठी दर्जेदार वेळ राखून ठेवून आनंदी जीवन जगू असे मत सहभागी महिलांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्ष मा श्री शिरीष दादा मधुकरराव चौधरी, आमदार, रावेर विधानसभा मतदारसंघ, सन्मा. संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, आय क्यू ए सी समन्वयक उपप्राचार्य डॉ उदय जगताप, क्रायटेरिया सामन्वयक डॉ ताराचंद सावसाकडे, डॉ एस व्ही जाधव, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कॅडेटसने मार्गदर्शन आणि सहकार्य केले.






