चोपडा तहसीलमधील पुरवठा विभागातील कर्मचारी निलेश गायकवाड यांचा अनेर नदीच्या डोहात बुडून मृत्यू,दोन जणांना वाचविण्यात यश
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील पुरवठा विभागातील लिपिक निलेश अशोक गायकवाड (३४)(मूळ रहिवासी भुसावळ) हे सुट्टी निमित्त इतर कर्मचारी व रेशन दुकानदार यांच्यासोबत मध्य प्रदेशातील ताजोद्दीन बाबा यात्रेसाठी जात असताना मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या अनेर नदीवरील उमर्टि येथील पुलाच्या खाली असलेल्या डोहात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २७ रोजी दुपारी घडली.तर इतर दोन जणांना वाचविण्यात यश आले.
सविस्तर असे की, चोपडा येथील पुरवठा विभागातील लिपिक निलेश गायकवाड ,अव्वल कारकून रवींद्र नेतकर आणि रेशन दुकानदार मधुकर राजपूत,अरुण पाटील यांच्यासह दहा जण दि २७ रोजी सकाळी चोपडा येथून ताजोद्दीन बाबा यात्रेसाठी निघाले होते.रस्त्यातच अनेर नदीवर असलेल्या पुलावर सर्व थांबले.आणि यापैकी लिपिक निलेश गायकवाड हे पुलाखाली शौचासाठी नदीत उतरले होते.मात्र निलेश गायकवाड यांचा पाय घसरल्याने नदीत असलेल्या डोहात ते बुडाले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध झाले.त्याच स्थितीत गायकवाड यांना वरला ता.सेंधवा जि बडवाणी (मध्यप्रदेश) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र निलेश गायकवाड यांना मृत घोषित केले.
निलेश गायकवाड हे स्वभावाने प्रामाणिक,शांत ,संयमी होते.कर्मचार्यांशी त्यांचे वर्तणूक चांगली असल्याने या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.तर वरला येथील पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेबाबत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे.गायकवाड यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.







