आदिवासी ठाकूर जमातीच्या वतीने विविध मागण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अमळनेर येथे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे जनादेश यात्रेच्या आगमनाप्रसंगी हेडावे चौफुली वर महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमातीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
जनादेश यात्रेचे अमळनेर-पारोळा रस्तावर हेडावे चौफुलीला आगमन झाले. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतुनच महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर,राज्य सरचिटणीस रणजित शिंदे यांनी दिलेले ठाकूर जमातीच्या विविध प्रश्नांचे निवेदन स्वीकारले.याप्रसंगी ना.गिरीश महाजन, आ.शिरीष चौधरी मुख्यमंत्री यांचे सोबत होते.निवेदनावर राज्यसरचिटनिस रणजित शिंदे, जिल्हाध्यक्ष गोपाळराव ठाकूर, अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर,सचिव प्रकाश वाघ, आदींच्या स्वाक्षरी होत्या.
ठाकूर जमातीच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने कार्यवाही करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली असून निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यात प्रामुख्याने अनुसूचित जमात प्रमाणपत्र तपासणी समित्यांनी ठाकूर जमातींचे उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रलंबित प्रस्ताव वैधता प्रमाणपत्र देऊन गतिमानतेने मार्गी लावावेत.
रक्त नात्यात वैधता प्रमाणपत्र असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रलंबित प्रस्तावात तातडीने वैधता प्रमाणपत्र अदा व्हावेत. मा.उच्च न्यायालयाने अथवा सर्वोच्च न्यायालयाने वैधता प्रमाणपत्र देणेचा निर्णय एखाद्या कुटुंबातील सद्स्यास दिला असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रलंबित प्रस्तावात समित्यांनी तातडीने वैधता प्रमाणपत्र अदा करावेत. निवृत्त न्यायधिश मा.हरदास समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात. नंदुरबार समितीच्या कार्यक्षेत्रातील जळगांव, धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी धुळे येथे तपासणी समितीचे कार्यालय सुरू करावे. अनुसूचित ठाकूर जमातीच्या उमेदवारांना शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणाचे लाभ मिळावे म्हणून सर्व जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांना प्रलंबित प्रकरणे काढण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत वरील मागण्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन स्तराहून जारी व्हाव्यात.अशी विनंती महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळ अमळनेर तर्फे करण्यात आलेली आहे.






