म्हसावद बालविकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांच्याकडून अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांची पिळवणुक…
प्रतिनिधी अमोल बैसाने
बालविकास प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ओळखपत्र देणे अनिवार्य असल्याने त्यासाठी पर्यवेक्षिका कडे कर्मचाऱ्यांनी दोन फोटो देणे अपेक्षित आहे. परंतु शहादा तालुक्यातील म्हसावद प्रकल्पाअंतर्गत अधिकारी आणि पर्यवेक्षिकेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून दोनशे रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. नियमानुसार खाजगी किंवा शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या ठिकाणाहून मोफत ओळखपत्र दिले जाते. परंतु ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून पर्यवेक्षकेने प्रत्येकी दोनशे रुपये जमा केले आहेत. याबद्दल महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुरे यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.
ग्रामीण भागात गाव पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांच्याकडून किती पिळवणूक होते आहे. याचे वास्तव उघड झालेच पाहिजे. फक्त ओळखपत्रासाठी दोनशे रुपये का घेण्यात आले याबद्दल विचारणा करण्यासाठी लवकरच अंगणवाडी कर्मचारी संघटनेमार्फत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी दिली आहे.
गाव पातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वेळेवर पगार दिला जात नाही. वाढीव पगाराची घोषणा करून देखील कार्यान्वित केली जात नाही. दरवेळेस मोर्चे काढून आवाज उठवला जातो परंतु अधिकारी दुर्लक्ष करतात. एखाद्या योजनेचे पैसे आले तर अधिकारी आणि पर्यवेक्षिका हफ्ते घ्यायला न चुकता हजर असतात.
महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत फक्त ओळखपत्रासाठी दोनशे रुपये उकळले जात असतील तर अंडी आणि केळी, पोषण आहार, अमृत आहार योजना, यामध्ये किती गोड बंगाल असेल याचा विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे. गाव पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय सहन करून घेणार नाही असे अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जाहीर केले आहे. त्यासाठी लवकरच धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी दिली आहे.







