अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर मानवी हिताचा – प्रा पी पी माहुलीकर
सलीम पिंजारी
हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर हीच भविष्यकाळाची नांदी असून या ऊर्जास्रोतांचा वापर मानव आणि पर्यावरणाच्या हिताचे असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा पी पी माहुलीकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, एच आर डी सी व तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने दिनांक ८ ते १२ जून दरम्यान पाच दिवशीय ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला असून भारतभरात सुमारे १०० प्राध्यापक सहभागी झाले आहेत. त्याच्या उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्रा पी पी माहुलीकर यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या समाजाला नवा दृष्टिकोन आणि जीवन जगण्याची नवी पद्धत अवलंबण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करीत, अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांवर एफ डी पी आयोजित होत असल्याबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉ पी आर चौधरी तथा समन्वयक डॉ उदय जगताप यांचे अभिनंदन केले व सर्व सहभागी प्राध्यापकांना स्व विकास साधून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचे विविध नाविन्यपूर्ण पर्याय मांडण्याचे आवाहन केले.
पाच दिवसीय ऑनलाइन एफ डी पी चे उद्घाटन मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार रावेर विधानसभा तथा अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी डॉ संजीव सोनवणे, संचालक, एच आर डी सी, पुणे, प्राचार्य डॉ आर एस पाटील, (शहादा) डॉ एस टी बेंद्रे, प्राचार्य डॉ आर बी वाघुळदे, ( जळगांव) डॉ के जी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, समन्वयक डॉ उदय जगताप, पदार्थविज्ञान विभाग प्रमुख डॉ सतीष चौधरी यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक एफ डी पी चे समन्वयक डॉ उदय जगताप यांनी केले. त्यांनी सद्यस्थितीत प्राध्यापकाची भूमिका व अक्षय ऊर्जास्त्रोतांचा पर्याय यावर सविस्तर विवेचन करीत सहभागी प्राध्यापकांना या एफ डी पी चा जास्तीत जास्त उपयोग करून समाज व पर्यावरणासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ संजीव सोनवणे, संचालक, एच आर डी सी, पुणे विद्यापीठ यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन करीत महाविद्यालयाचे कौतुक केले व सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन चा एक संधी म्हणून कसा उत्तम प्रकारे उपयोग करता येईल यावर विवेचन केले.
अध्यक्षीय समारोपात मा श्री शिरीषदादा चौधरी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत एकजुटीने व सर्वांच्या सहकार्याने या संकटावर मात करता येईल व पुन्हा सुखी, संपन्न व आनंदी आयुष्य जगता येईल मात्र त्यासाठी सर्वांनी आपापल्यापरीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार डॉ सतीष चौधरी यांनी मानले.






