मोठा वाघोदा विजेच्या कमी दाबाचा व लपंडावाने शेतकरी हवालदिल वीज शाखा अभियंता पद रिक्त लाईनमन हाकतोय तारेवरची कसरत करीत कार्यालयाचा गाडा
प्रतिनिधी मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा परिसरातील शेतकऱ्याला सावदा विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे पिकांना वाचवण्यासाठी सध्या शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे.वारंवार वीज खंडित होत असल्याने व कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने या कडाक्याच्या उन्हात पिकांना चार ते पाच तासच पाणी उपलब्ध होत असल्याने पिकांना वाचवण्यासाठी शेतकर्याला रात्रीच्या वेळेसही शेतातच थांबावे लागत आहे.केळी व कापुस लागवडीची लगभग सुरू असतांना अशाच प्रकारे वीजेची अनियमितता राहिल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता असतांना विद्युत मंडळाच्या संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन विजेचा नियमित वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तसेच मोठा वाघोदा येथील विद्युत कार्यालयात शाखा अभियंता पद रिक्त असून कोचूर ( सावदा) येथील शाखा अभियंता कडे मोठा वाघोदा येथील विद्युत कार्यालयाचा तात्पुरता पदभार आहे मात्र या महाशयांनी मोठा वाघोदा येथील विद्युत कार्यालयाचा द्वार दर्शन सुद्धा केलं नसल्याचे ऐकिवात आहे त्यामुळे या कार्यालयात नियुक्त लाईनमन ला तारेवरची कसरत करीत कार्यालयाचा गाडा कसाबसा हाकवावा लागत आहे.गावातील विद्युत खांब गंजलेल्या सडक्या परिस्थिती चे झालेली आहेतच त्यासोबतच जीर्ण झालेल्या शतक वर्षांपूर्वी च्या विद्युत तारा लोंबकळत नागरिकांच्या मृत्युला आमंत्रण देत आहेत मात्र विज मंडळाला नागरिकांच्या व शेतकर्याच्या जीवाची काही एक सोयरसुतक नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे व एखाद्या महाभयंकर घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट बघते आहे की काय ? काही वर्षापूर्वी विद्युत् मंडळाच्या गलथान कारभारामुळे च मोठा वाघोदा येथील ट्रकवर बसलेल्या ४ केळी मजुरांचा लोंबकळत असलेल्या वीजतारांनी बळी घेतला होता.यासह अस्मानी संकटामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना कमी दाबाचा व वारंवार खंडित केला जाणार्या वीजपुरवठयामुळे शेतकरी वर्ग व नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत तरी विज मंडळाच्या वरिष्ठांनी विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये नाहीतर संयमाचा बांध फुटून उद्रेक झाल्यास विद्युत मंडळ जबाबदार असेल असेही तीव्र संतापाची लाट शेतकरी वर्ग व सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत






