केंद्र व राज्य शासन यांच्याकडून लॉकडाऊन च्या कालावधीतील नवीन आदेश जारी
दिंडोरीत प्रशासनाने लागू केला आदेश
सुनिल घुमरे
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि. 31/05/2020 पर्यंत वाढविला आहे. याबाबतचे आदेश दिंडोरी व पेठ तालुक्यात लागू करण्यात आल्याची माहिती प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर यांनी दिली आहे.
यासंदर्भातील राज्य शासनाचे आदेश दि. 19/05/2020 रोजी प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने आदेशांचे काही अटी व शर्तींच्या अधिन राहून व्यवसाय / आस्थापना / दुकाने सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली असून सदर आदेशाची अंमलबजावणी दि. 22/05/2020 पासून करणेत येणार आहे. या आदेशात नमूद प्रमुख अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
1. व्यवसाय / दुकानदार / आस्थापना चालक यांनी व्यवसाय सुरू ठेवताना Social Distancing (दोन व्यक्तींमध्ये किमान 1 मीटर अंतर ठेवणे) चे पालन करणे बंधनकारक आहे.
2. व्यवसाय / दुकानदार / आस्थापना चालक यांनी स्वत:, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी व येणाऱ्या सर्व ग्राहकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
3. व्यवसाय / दुकानदार / आस्थापना चालक यांनी दुकानामध्ये सॅनिटायझरचा वापर दुकानात येणाऱ्या सर्वांसाठी करणे आवश्यक व वेळोवेळी दुकानाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
4. व्यवसाय / दुकानदार / आस्थापना चालक यांनी दुकानात मालक, कर्मचारी व ग्राहक सर्व मिळून एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देऊ नये.
5. व्यवसाय / दुकानदार / आस्थापना चालक व ग्राहक यांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणेस बंदी आहे.
6. जीवनावश्यक वस्तु व सेवा सोडून इतर व्यवसाय / दुकाने / आस्थापना ह्या सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 या कालावधीत सुरू ठेवता येतील.
7. संध्याकाळी 7.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवा यांचेसाठीच घराबाहेर पडता येईल. मात्र याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी घराबाहेर पडणेस पूर्णत: प्रतिबंध असेल.
8. दुकानासमोर दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग करणेस प्रतिबंध असेल. तसेच दुचाकीवर एका व्यक्तीस आणि चारचाकी वाहनात वाहनचालक व दोन व्यक्ती यांना प्रवास करता येईल.
9. सर्व प्रकारची हॉटेल, पानटपऱ्या, परमीट रुम, बार, लॉज बंद असतील. हॉटेलला घरपोच सेवा (Home Delivery) देणेची परवानगी असेल. तसेच स्विटमार्टमध्ये फक्त पदार्थांची व वस्तुंची विक्री करता येईल. परंतु तेथेपदार्थांचे सेवन करता येणार नाही.
10. वरील अटी व शर्तींचे पालन न केल्यास संबंधित व्यवसाय / दुकाने / आस्थापना तातडीने सिल करण्याचे अधिकार नगरपंचायत क्षेत्रात नगरपंचायत प्रशासनाला व ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायत प्रशासनाला असतील. तसेच सदर आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यावसायिक / दुकानदार / आस्थापना चालक फौजदारी कारवाईसही पात्र असेल.
दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की आपण वरील दुकानांमध्ये जाताना अत्यंत तातडीच्या वस्तु खरेदी करणेसाठी जावे. जाताना फक्त एका व्यक्तीनेच जावे. Social Distancing चे पालन करावे. मास्कचा सर्वांनी वापर करावा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा.
आपल्या गावात कोरोना इतर बाधित क्षेत्रातून विनापरवानगी कुणीही व्यक्ती आल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनास कळवावी. परवानगी घेऊन आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनास कळवावी. अशा व्यक्तींना 14 दिवस घरात विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्याबाबत खातरजमा करावी. असे व्यक्ती विलगीकरणाचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेऊन तसे झाल्यास त्याचीही माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी. मालवाहतूक करणारी वाहने, भाजीपाला वाहतूक करणारे वाहने यांचे वाहनचालक यांनी जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी प्रवास करून आलेनंतर घरात थांबणे बंधनकारक असून वेळोवेळी वाहनाचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी व दुकानदारांनी कोणत्याही परिस्थितीत गावात व शहरात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे,गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, वणी पोलीस स्टेशन चे निरीक्षक प्रवीण पाडवी, तालुका वैधकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ विलास पाटील प्रशासनाच्यावतीने आदींनी केले आहे.






