? कव्हर स्टोरी..
पान्हा.. नग्न व्यवस्थेचा भयानक चेहरा…भूक
अतिथी संपादक-डॉ प्रवीण तांबे
हातातला पेन जरा बाजूला ठेवला…सारखे बसून बसून पाठीला कळ लागली होती .
दुपारचे तीन वाजले होते .बाहेर प्रचंड उन्ह होते .
फॕन पाच वर असूनही गरम होत होते .
दोनला ओपीडी बंद करण्याची वेळ असते पण पेशंट होते त्यामुळे जरा लेटच झाले होते ..
जेवण बाकी होते म्हणून आईचा दोनदा फोनही येऊन गेला ..येतो पेशंट आहे ..असे सांगून मी आपला पेशंट बघण्यात रमलो..
बाहेर वेटीगं मध्ये अजून तीन पेशंट होते. तेवढे बघावेच लागणार होते .
इतक्यात बाळाचा कर्कश कानाला कानठळ्या बसावा इतक्या काकुळतीने रडण्याचा आवाज माझ्या कानी पडला .
“साहेब बघा ना याला आधी ..राहतच नाही तो ..”
कॕबीन चा दार उघडून तीशीतली ती बाई विनवणी करत होती ..
लाल कलरची मळकट साडी घातलेली. केस भुरकट काळे रंगाचे .रंगाने सावळी ..कपाळावर आणि हातावर गोंधलेले…खाद्यांवर महीनाभरच बाळ ..दार उघडताच घामाचा उग्रवास तिच्यासोबतच आत आला .

बाहेर बसलेले इतर पेशंट तीच्याकडे कुत्सित नजरेनं बघत होते ..सोशल डिस्टन्सिंग मुळे अधिच तिच्या पासून चार हात दूर बसलेले तिच्या अशा वागण्यामुळे ते अधिकच तिरस्काराने तिला बघू लागले….
आम्ही आधी आलोय डॉक्टर ..असा भाव त्यांच्या डोळ्यात जानवला पण तरीही या बाळाची अवस्था बघून मी बाळाला आत घेतले.
बाळ सारखे रडतच होते ..
..
टेबलवर ठेवा त्याला .. मी त्या बाईला सांगितले ..
“काय झालं ..कधी पासून रडतोय हा ..”
“त्यो रडतोच हाये सारखा ..”
“डिलीव्हरी कधी झाली …?”
“महिना झालं ..”
व्यवस्थित चेकअप केले पण बाळाला बाकी काही लक्षणे जाणवली नाही ..
पोटात दुःखत असेल म्हणून पॕलपेट करुन बघितले पण तसलं ही काही जाणवेना ..
“भूक लागली असेल ..त्याला पाजून बघा जरावेळ ..” तिच्याकडे बघत मी म्हणालो ..
“कुठून पाजू ..? ..दुध नाही उतरत
ती बाळाला कडेवर घेत बोलली …
“महिना झाला ना ..मग ..दुध तर यायलाच हवं ..”
“इथं माह्या पोटाला काही भेटना साहेब …
फकस्त तांदूळ खाऊन कुठून दुध उतरनार हाये..”
तिला समोर बसवले आणि नीट सांग काय काय होतय बाळाला.. कधी पासून नीट दुध मिळत नाहीये त्याला मग दुध नाही तर वरचे दुध ..पावडर काय देता तुम्ही त्याला …सगळं सांगा ..

काय सांगू साहेब ..नशिब करंट माझं ..
दोन पोरीच्या पाठीवर हे पोरग झालं .
पण ह्यो आला आणि तोडांची भाकरच तुटली बघा आमची…
फुटक्या पायाच वांग कुठलं…”
त्याचा राग राग करत ती सांगत होती..
एक आई आपल्या पोटच्या मुलाला असे बोलताना पहिल्यांदा बघितले मी ..त्यामागे निश्चितच तिची निराशा ..हताशपणा ..हे कारण होते तरी एक आई असे बोलते हे मनाला पटत नव्हते.
ती पुढे बोलत होती ..
“रोजंदारी करतो साहेब आम्ही ….घरात दोन पोरी त्यांचा बाप ..सासू सासरे ..आणि आता हे पोर ..
असे सहा जण एक खोलीत हायीत …
महिना झाला हाताला काम नाही ..
घरात व्हत नव्हतं सम्नद कव्हाच संपलं ..
हंडाभर पाण्याला वनवन करत फिराव लागतं..
वर पञा तापतो ..घरात टेबल फॕन हाय पण त्योबी एकच …
कोणा कोणाला वारा लागल त्याचा..
दर वरीस उन्हाळा लागला की ह्याचा आज्जा आज्जी ..मंदिराच्या ओसरीत झोपायला जायचं …
पण त्यांनाबी बाहेर पडता येइना झालय..
आता ते बी नाय .. वर पञा तापतो बाहेर उन्ह मोकार चटके मारत ..खोलीत जाम उकडतं ..
मधी घामान जीव कसनूस होतं ..बाहेर जाता येत नाय..
पंखा हाय तर म्हतार त्याला चिटकून बसतय..
दिस उजाडला तर हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत तेबी लपून छपून..
त्यात पोट भर घरात घायला नाय ..
घाम फुटतो पण पान्हा फुटाना …
त्याला मी काय करु साहेब ..
मग तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू …?”
तिचे बोलणे ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो..
ओली बाळंतीन ती.. पोटभर जेवण नाही म्हणून पान्हा फुटत नाही ..बाळ भूकेने रडरड रडतयं…
पण खायला काही नाही..
कुठले औषध देऊ मी त्या बाळाला ?
माझा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव ..माझी बौद्धिकता ..सायकोडायनामाईकची थेरी ..मानसशास्त्र ..सर्वच फोल ठरले होते …
पेन हातात घेतला ..हात थरतरत होता..कुठले औषध लिहावे समजत नव्हते …..
घरात आईने स्वयंपाक बनवला होता ..ओपीडी झाली कि मस्त जेवणार होतो ..
माझ्यासारखेच आपणही पुढचा महिना भराचा किंबहुना जास्त किराणा भरुन ठेवला असेल ..
खायला कमी पडणार नाही महिना दोन महिने याची सर्व तरतूद करणे फक्त ह्याच एका गोष्टी साठी आपण बाजारपेठत गर्दी करतोय …
आपल्याला छान कपडे आहे . ..खायची ही चंगळ आहे ..करमणूक म्हणून टीव्ही ..फोन ..नेट असे सर्व साधने उपलब्ध आहे ..
फॕन …कूलर..एसी…उन्हाची झळ आपल्यापर्यंत पोहचू देत नाहीये …
कमीजास्त फरकाने आपले सर्वांचेच आयुष्य असे सुरु आहे सध्या … पण ….
या बाहेरही एक दुसरे जग आहे …
जिथे सकाळी भेटलेल अन्न पुरवून पुरवून खाल्ले जाते कारण परत मिळेल का नाही याची शाश्वती नाही….
हाताला काम नाही म्हणून पुरेसा पैसा उपलब्ध नाही..
बाहेर पडायला भीती वाटते..
घरात भूक बसू देत नाही …..
खूप सारे प्रश्न आहे …पण उत्तर मला सापडत नाहीये …
हातात पेन तसाच आहे ..बाळ अजूनही रडतय…
ती माझ्याकडे आशेने बघतेयं…
पण ……..
औषध नक्की कुणाला देऊ ..
बाळाला …ज्याला भूक लागली म्हणून तो रडतोय..
आईला …. तिला दुध येत नाही म्हणून बाळ उपाशी आहे ..
कि..
परिस्थिती ला ….?






