प्रतिनिधी फहिम शेख
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत-डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार दि.3- केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत एप्रिल, मे व जून महिन्यासाठी दिलेल्या अन्नधान्याचे वितरण त्या-त्या महिन्यात होणार असून या तिन्ही महिन्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 5 किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.
एप्रिल 2020 मध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल. ई-पॉस यंत्रावर एप्रिल महिन्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या फक्त तांदळाचे मोफत वितरण करण्यात येईल. तांदळाचे वाटप करताना लाभार्थ्याने नियमित अन्नधान्याची उचल केल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. मोफत वितरण केले असले तरी दुकानदाराने पावती सांभाळून ती तहसील कार्यालयात जमा करावी, तसेच लाभार्थ्याचे मोबाईल क्रमांक लिहून घ्यावे.
अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेले नियमित 35 किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येईल. म्हणजे शिधापत्रिकेवर 1 सदस्य असल्यास 5 किलो, 2 सदस्य असल्यास 10 किलो याप्रमाणे मोफत वितरण होईल. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या 5 किलो धान्य प्रति सदस्य या प्रमाणात वितरण केल्यानंतर प्रति सदस्य 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येईल.
मोफत अतिरिक्त तांदळाचे वितरण ई-पॉस यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. एप्रिल 2020 साठी मोफत तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम एफसीआयकडून प्राप्त करून घेण्यात येत आहे. हा तांदूळ प्राप्त झाल्यावर त्वरीत दुकानदारांमार्फत त्याचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यातील 1061 रेशन दुकानदारांमार्फत अंत्योदय योजनेतील 5 लाख 36 हजार 109 व प्राधान्य कुटुंबातील 7 लाख 6 हजार 939 सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करण्यात येईल. दोन्ही योजनेअंतर्गत नियमित धान्य वितरण तांदूळ 3 रुपये प्रति किलो व गहू 2 रुपये प्रति किलो याप्रमाणे होईल.
नियमाविरुद्ध वर्तन केल्यास दुकानदारांवर कारवाई
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दुकानदारांनी शासन नियमाप्रमाणे दर आकारावे व लाभार्थ्याकडून अतिरिक्त पैशाची मागणी करू नये. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत वितरीत होणाऱ्या तांदूळासाठी पैसे आकारू नये व प्रमाणही कमी करू नये.
गावातील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवक यापैकी एका सदस्यास बोलावून त्याच्यासमोर वाटप करावे. दुकानदारांनी नियमांचा भंग केल्यास महाराष्ट्र अनुचित वस्तू (विनिमय व वितरण) आदेश 1978, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. भारुड यांनी स्पष्ट केले आहे. अशा कठीण प्रसंगी रेशन दुकानदारांनी नागरिकांच्या सेवेसाठी तत्परता दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गॅस सिलेंडरची रक्कम खात्यात जमा होणार
पुढील तीन महिन्यांसाठी उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या गॅस सिलेंडरची रक्कम केंद्र शासनामार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्याच्या मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येईल. तो सांगितल्यावर गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. मोबाईल नसल्यास प्रत्येकवेळी विहित नमुन्यातील अर्ज प्रत्येकवेळी भरून द्यावा लागेल.
त्याचप्रमाणे शहादा व तळोदा तालुका वगळता इतर तालुक्यात 144 किलोलीटर केरोसीन नियतन करण्यात आले आहे. 1 सदस्यास 2 लिटर, 2 सदस्य असल्यास 3 लिटर व 3 पेक्षा अधिक सदस्य असल्यास 4 लिटर केरोसिन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.
—-






