बारामती तालुक्यात केले 4779 जणांना होम क्वांरटाईन
बारामती – बारामती तालुक्यात पुणे,मुंबई आणि अन्य ठिकाणाहून गावात आलेल्या सुमारे 4779 जणांना होम क्वांरटाईन केलेले आहे.तर 92 परदेशी व्यक्तींना घरातच आरोग्य विभागाच्या देखरेख खाली ठेवले आहे.तसेच बारामतीला एकही व्यक्ती कोरोनाबाधित नाही अशी माहिती बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.कामानिमित्त मुंबई,पुणे आणि अन्य ठिकाणी असलेल्या व्यक्ती मागील चार-आठ दिवसांत बारामतीत आपल्या मूळ गावी परतले आहेत,मात्र कोरोना संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्यापासून इतरांना त्रास होऊ नये,यासाठी त्यांना होम क्वांरटाईन केले जात आहे.प्रशासनांकडून अशा व्यक्तींना 188नुसार नोटीस दिली जात असून हातावर शिक्के मारले जात आहे.होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये अशा सूचना संबंधित ग्रामपंचायती,ग्रामसेवक,तलाठी, पोलिस पाटील आणि आरोग्य सेवक यांनी दिल्या आहेत.बारामतीच्या पश्चिम भागातील एका गावातील व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलेला आहे.आरोग्य विभागाने आणि अन्य शासकीय यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असून नागरिकांनीही घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.






