? कुणीही यावे कर्ज घ्यावे आणि बुडवून परदेशी पळावे …येस बँकेच्या पळकुट्यांना घेरले
प्रा जयश्री दाभाडे
भारतात सामान्य लोकांचा न्यायव्यवस्था आणि बँक यांच्यावर नितांत विश्वास आहे. परंतु गेल्या काही वर्षात बँकेचे मोठ्या कर्ज दारांनी बुडविले कर्ज आणि स्वतः बँकेचाच घोळ येस बँकेच्या निमित्ताने समोर आला आहे.
भारतात गैरमार्गाने कर्जे उचलायची, ती थकवायची आणि अगोदरच परदेशात सोय करून ठेवून तिकडे पळ काढायचा, असा पायंडा गेल्या काही वर्षांत पडला आहे. त्यात विजयकुमार मल्ल्या, नीरव मोदी, नरेश मेहता यांच्यासारखे जसे आहेत, तसेच काही बँकर्सही आहेत. ज्यांचा कधी काळी जागतिक आदर्शात उल्लेख व्हायचा, त्यात चंदा कोचर यांनाही पैशाचा मोह पडला होताच. व्हिडिओकाॅनच्या धूत कुटुंबाला दिलेले कर्ज, त्याच्या बदल्यात मिळवलेला फायदा याची चर्चा झाली. पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक आणि आता येस बँकेत ज्या प्रकारे कर्जवाटप करून स्वतःचा फायदा करून घेतला, तो पाहिला, तर ही प्रवृत्ती सध्या बळावते आहे, हे लक्षात येते. बँकेच्या संस्थापकांनाही आपल्या नावापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा वाटायला लागला आहे.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी दिलेले कर्ज, त्यांचा दुरून का होईना गुन्हेगारी जगताशी आलेला संबंध हे सारेच बँकिंग व्यवसायाला विचार करायला लावणारे आहे. सामान्य ठेवीदारांचा घामाचा पैसा असा वाममार्गाला लावला जात असेल, तर ते गैर आहे. येस बँक प्रकरणात चौकशी यंत्रणांनी राणा कपूर कुटुंबाला आता चांगलेच घेरले आहे. राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर हिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले. तिचा आणि तिच्या नव-याचा लंडनमध्ये पळून जाण्याचा बेत होता. मोदी, मल्ल्या आणि आता कपूर ही सारीच गैरव्यवहारी मंडळी लंडनलाच का आश्रय घेतात आणि तिथेच का संपत्ती करतात, याचा एकदा सखोल अभ्यास व्हायला हवा.
राणा कपूर यांचा जावई आदित्य याच्याविरुद्धही लूक आऊट नोटीस आहे. त्याअगोदर राणा कपूर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कसून चाैकशी केली. त्यांना ११ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. राणा कपूर यांची काही गुंतवणूक संशयाच्या भोव-यात आहे. त्यांनी दोन हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या संपत्तीत गुंतवणूक केली. ही संपत्ती भारतातच आहे. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी काळा पैसा वापरल्याचा संशय चौकशी यंत्रणांना आहे. तसेच कपूर यांच्या ब्रिटनमध्ये काही ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती आहे. अनेक शेल कंपन्या सुरू करून काळी संपत्ती गोळा केल्याचा आरोप राणा कपूर यांच्यावर करण्यात ठेवण्यात आला आहे.
कर्ज चुकवण्याची कुवत नसतानाही दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनला (डीएचएफएल) कपूर यांच्या मदतीने कर्ज पुरवण्यात आल्याचे पुरावेही ईडीला सापडले आहेत. राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर आणि त्यांच्या तीन मुली राखी कपूर – टंडन, रोशनी आणि राधा यांच्या नावावरही अनेक कंपन्या आहेत. देशातील अनेक दिग्गज व्यावसायिकांद्वारे सुरू करण्यात आलेली खासगी येस बँक संकटात जाण्यास कपूर यांचा कारभार, त्यांचे कर्जवाटप जबाबदार आहे.






