हृदयाच्या अंतरीतून मायबोलीचा जागर व्हावा
– प्रा पंकज पाटील
विलास ताठे
रावेर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारात २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विचार पिठावर समारंभाच्या अध्यक्षस्थानी अगर प्रमुख निलेश बेंडकुळे व प्रमुख वक्ते म्हणून भुसावळ येथील जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रावेर येथील सौ के एस ए गर्ल्स हायस्कूल व ज्यू कॉलेजचे प्रा पंकज पाटील उपस्थित होते. प्रारंभी कुसुमाग्रज व छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा पंकज पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मराठी भाषेला समृद्ध इतिहास आहे. सन ९०५ मध्ये श्रवण बेलगोळ येथे पहिला शिलालेख आढळला. ज्यावर लिहिले होते. ‘ श्री चामुंड राये करविले ‘ येथून सुरू होत मराठी भाषा वैदिक, पूर्ववैदिक, संस्कृत, पाली व प्राकृत ते आजच्या मराठी भाषेचा प्रवास दिमाखदार होत गेला. अनेक भाषिक आक्रमण पेलावतच नव्हे तर झुगारून देत माय मराठी ने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मोघल काळात उभे ठाकलेली प्रश्न २००१ च्या दशकात रूप बदलून उभे ठाकले. पण याठिकाणी देखील ती तरली. नंतर इंग्रजीच्या भाषिक व तंत्रज्ञान युगाच्या प्रभावसमोर मराठी टिकाव धरू शकणार नाही. अशी अनेक तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली. पण मराठी भाषा प्रेमींनी मराठीचा वापर महाजालावर एवढ्या मोठ्या प्रमाणात केला की, आज महाजलाची भाषा देखील आज मराठी होवू पाहत आहे. तसेच मराठी भाषा साहित्यात संतांनी दिलेले योगदान हेच खरे मराठी भाषेला अमारत्वाकडे नेत आहे. मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर हृदयाच्या अंतरीतून मायबोलीचा जागर व्हावा असे प्रतिपादन प्रा पंकज पाटील यांनी यावेळी केले.
तर समारंभाध्यक्ष निलेश बेंडकुळे यांनी मराठी भाषेचा वापर आपण दैनंदिन जीवनात क्षणनक्षणाल करावा. एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यास विनाकारण आपण इंग्रजी किंवा हिंदी भाषेच्या कुबड्या घेतो. ते कितपत उचित आहे ? हा प्रश्न आपल्या मराठी मनाला विचारा. तसेच आपली स्वाक्षरी देखील आपण मराठीतून च करावी. असे प्रतिपादन आगर व्यवस्थापक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम. बी. चौधरी यांनी केले
*प्रवाशांना पेढे व खडीसाखर वाटून मराठी गौरव दिन केला साजरा*
प्रसंगी मराठी राजभाषा दिनाचा उत्सव रावेर बस आगारातील कर्मचारी , आगर व्यवस्थापक निलेश बेंडकुळे, प्रा पंकज पाटील, एम. बी. चौधरी व राणे यांनी प्रवाशांना पेढे व खडी साखर वाटून साजरा केला. तसेच उपस्थितांना मराठीतून संवाद साधण्याचा आग्रह देखील केला.
Photo – छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना प्रा पंकज पाटील, निलेश बेंडकुळे, एम. बी. चौधरी व राणे






