Maharashtra

?स्पर्धा परीक्षा विशेष…..खरे स्वच्छता दूत,कृतीवादी समाजसुधारक गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

? स्पर्धा परीक्षा विशेषखरे स्वच्छता दूत,कृतीवादी समाजसुधारक गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

संकलन प्रा जयश्री दाभाडे

डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच गाडगे महाराज उर्फ गोधडे महाराज यांचा जन्म: २३ फेब्रुवारी १८७६ अमरावती जिल्ह्यातील कोतेगाव शेंडगाव येथे झाला. महाशिवरात्रीला तिथीने गाडगेबाबांचा जन्मदिन येतो.

एक सामाजिक जागृती करणारे कीर्तनकार आणि समाजसुधारक म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. सामाजिक जनजागृती करण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त आवड होती. विसाव्या शतकातील समाजसुधारणा आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी राणोजी जानोरकर असे होते.गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत असत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते.

तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.

  • “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका,
  • सावकाराचे कर्ज काढू नका,
  • अडाणी राहूनका,
  • पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.

अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या.

तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.

आपल्या नावापेक्षा गाडगे बाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचीत झालेले एक थोर समाजसुधारक म्हणुन आज देखील आदराने ज्यांचे नाव आपल्या ओठांवर येते ते संत गाडगे महाराजांचे.

त्या काळी भारतीय ग्रामिण समाजात मोठया प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांमुळे बदल घडुन आला. आज देखील अनेक राजकिय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातुन प्रेरणा घेत आहेत.

संपुर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्याबदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता किर्तन करायचं, त्यातुन समाज प्रबोधन करायचं, समाज कल्याणाचा प्रसार प्रचार करायचा. आपल्या किर्तनात ते संत कबीरांच्या दोहयांचा देखील उपयोग करत असत.

गाडगे बाबा ज्या ही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता झाल्यानंतर गावक.यांना गांव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत.

सामाजिक प्रबोधनातुन लोकांच्या मनात ज्या अंधश्रध्दा घर करून बसलेल्या आहेत, ज्या अनिष्ट प्रथा, ( बोकड कापणे, कोंबडं कापुन देवाला वाहाणे) लोकांच्या मनातुन उदाहरण देऊन गाडगे बाबा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असत. गावकरी त्यांना गोळा करून पैसे देत त्याचा उपयोग गाडगे बाबा गावाच्या विकासाकरताच करत असत.

गावातुन मिळालेल्या पैश्यातुन गाडगे महाराजांनी अनेक शाळा, धर्मशाळा, रूग्णालयं आणि जनावरांकरता गोशाळा देखील उभारल्या. गाडगे महाराज जनतेला जनावरांवर होत असलेल्या अत्याचारापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. समाजात चालत असलेल्या जातीभेद आणि वर्णभेदाला संपवण्याकरता त्यांनी खुप प्रयत्न केले.

समाजात दारूबंदी व्हावी याकरता सुध्दा बांबांनी बरेच प्रयत्न केले. गाडगे महाराज लोकांना कठोर परिश्रम, सामान्य राहाणीमान आणि परोपकार याला अंगिकारण्याचे धडे देत. महाराजांनी कित्येकदा मेहेर बाबांची भेट घेतली होती. मेहेर बाबांनी देखील गाडगे महाराजांना आपल्या आवडत्या संतामधील एक म्हंटले होते.

गाडगे महाराजांनी मेहेर बाबांना पंढरपुर येथे आमंत्रीत केले होते त्यावेळी 6 नोव्हेंबर 1954 ला हजारो लोकांनी मेहेर बाबा आणि गाडगे महाराजांचे एकत्र दर्शन घेतले होते.

महाराजांनी केलेली महत्वाची कार्य

  • ग्रामस्वच्छता
  • अंधश्रध्दा निर्मृलन
  • जनजागृती
  • धर्मशाळा, गोशाळा, रूग्णालयं, शाळा, वसतीगृह यांची उभारणी

महाराष्ट्राच्या काना कोप.यांत त्यांनी अनेक धर्मशाळा, गोशाळा, विद्यालयं, चिकित्सालयं आणि वसतीगृहांची निर्मीती केली.

त्यांना मिळालेल्या दानातुन, देणग्यांमधुन त्यांनी या सर्व गोष्टींची उभारणी केली परंतु स्वतःकरता एक झोपडी देखील या महापुरूषाने बांधली नाही.

  • १९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
  • १९२५ : मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
  • १९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगे महाराजांनी केले.
  • फेब्रुवारी ८,इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन’ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
  • १९३२ : ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगे बाबांनी सुरू केले.
  • १९३१ : वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
  • १९५४ : जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.

संत गाडगे महाराजांचे दहा सूत्र संदेश

  • भुकेलेल्यांना… अन्नं
  • तहानलेल्यांना… पाणी
  • उघडयानागडयांना… वस्त्रं
  • गरीब मुलामुलींना… शिक्षणाकरता मदत
  • बेघरांना… आसरा
  • अंध अपंग रोग्यांना… औषधोपचार
  • बेरोजगारांना…रोजगार
  • पशुं-पक्षी मुक्या प्राण्यांना… अभय
  • गरीब तरूण.तरूणींचे… लग्नं
  • गोरगरिबांना… शिक्षण

आयुष्यात कोणताही चमत्कार न करणारे समाजसुधारक संत गाडगेबाबा हाच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्रातला विस्मयकारी चमत्कार होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून आचार्य अत्रे यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींनी गाडगेबाबांना मोठेपण आणि त्यांच्या असामान्य कार्याचे महत्त्व जाणले. वेळोवेळी त्याविषयी लिहिले. प्रबोधनकारांनी तर गाडगेबाबा असतानाच त्यांचे चरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध केले. गाडगेबाबांच्या ओघवत्या वर्हाडी वाणीतले कीर्तन ऐकून स्तिमित झालेले आचार्य अत्रे उद्गारले, सिंहाला पहावं वनात, हत्तीला पहावं रानात, तसं गाडगेबाबांना पहावं कीर्तनात. त्यांचे कीर्तन ऐकले नव्हते तोपर्यंतची आयुष्याची सारी वर्षे वाया गेली होती असे वाटले.
महात्मा फुले हा चित्रपट त्यांनी निर्माण केला. त्यावेळी चित्रपटाची सुरुवात गाडगेबाबांच्या चार वाक्यांनी व्हावी असे त्यांना वाटले. मंगलाचरण या शीर्षकासह गाडगेबाबांचे बोलणे आणि देवकीनंदन गोपाला हे प्रसिद्ध भजन चित्रित झाले. येत्या महाशिवरात्रीला तिथीने गाडगेबाबांचा जन्मदिन येतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात असलेली प्रचंड निरक्षरता, वारंवार पडणारा दुष्काळ, गावेच्या गावे भुईसपाट करणार्या रोगांच्या साथी, ब्रिटिश राजवटीचे तापदायक प्रशासन, सगळीकडून होणारे शोषण आणि जन्माबरोबर साथ आणि सोबत करणारे दारिद्यर, महायुद्धांमुळे वाढलेली महागाई यामुळे सामान्य माणूस जणू मरणाची शिक्षा भोगत होता. संत तुकारामांच्या शब्दांत बोलायचे तर भिंगुळवाणा झालेला माणूस दैववादी, अंधश्रद्धाळू व कुणाच्याही पायांवर डोके टेकवणारा न झाला तरच नवल आणि डोके टेकवायला अवतीभवती ढोंगी साधू असतील तर प्रश्नच मिटला. म्हणूनच गाडगेबाबा, तुकारामांप्रमाणेच या विकृतीवर कळवळ्याने प्रहार करतात. वारंवार संत तुकारामांच्या वचनांचा आधार घेतात. पाप अंतरातले नाही गेले| दाढी मिशीने काय केले? असे तुकारामांचे वचन वापरून बाबांनी अंधश्रद्धांविरोधात आघाडीच उघडली आणि आयुष्यभर नि:स्पृहतेने, अपरिग्रहतेने जीवन जगून पीडित, शोषितांसाठी धर्मशाळा बांधून प्रचंड कार्य केले.
स्वच्छता हाच गाडगेबाबांचा परमेश्वर होता. हाती खराटा आणि माथी गाडग्याचे खापड घेऊन चिंध्यांचा अंगरखा ल्यालेला असा द्रष्टा, अलौकिक समाजोद्धारक संत महाराष्ट्राने अलीकडच्या काळात प्रत्यक्ष पाहिला. बाबांच्या या शिकवणुकीतून सुशिक्षित म्हणवणारेही किती शिकले हा प्रश्नच आहे. संदर्भ

  • लोकोत्तर गाडगे महाराज जीवन आणि कार्य ले द ता भोसले
  • लोकशिक्षणाचे शिल्पकार रा तू भगत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button