इचलकरंजीत घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात पती -पत्नी ठार
प्रतिनिधी अनिल पाटील
इचलकरंजी – येथील शहापूर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होवून पतीचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. नदीम शेख व शमिना शेख अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या घटनेत सहा महिन्याचे बाळ मात्र सुखरुप बचावले.*
*शहापूर येथील आंबेडकर चौकात आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची तीव्रता इतकी भयानक होती की यामध्ये घराचे छप्पर उडून गेले. शमिना हिच्यावर आयजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.*
या घटनेने संपूर्ण शहापूर परिसर हादरला. स्फोटामुळे सिमेंटच्या पत्राचे छताचे तुकडे दूरवर पडले होते. नगरसेवक उदयसिंग पाटील व अन्य नागरिकांनी तातडीने जखमी शमिनाला खासगी वाहनांतून रुग्णालयात हलविले.
नदीम याचे मूळ गाव चंदूर (ता. हातकणंगले) आहे. शमिना या बाळंतपणासाठी माहेरी शहापूर येथे आल्या होत्या. घरातील सर्वजण रोजगारासाठी गेले होते. शमिना सकाळी स्वंयपाक करीत असताना हा स्फोट झाला.

