Mumbai

?मोठी बातमी..नाना पटोले यांनी अखेर दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा..!कोण असतील नवे अध्यक्ष..!

?मोठी बातमी..नाना पटोले यांनी अखेर दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सादर केला. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे अध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्ष असलेल्या झिरवळ यांच्याकडे आला आहे.
राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आणि या पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

नवीन विधानसभा अध्यक्ष कोण?

नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.

त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.
प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची कशी झाली निवड? असा आहे घटनाक्रम
गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा राज्यात आणि दिल्लीत होत आहे. गुजरातचे प्रभारी राजीव सातव आणि नाना पटोले या दोन नेत्यांमध्येच खरी चुरस होती. पण बुधवारी अचानक राज्यात करण्यात येणाऱ्या या नियुक्तीसंदर्भात चक्र फिरायला सुरुवात झाली. सकाळी राज्याचे काँग्रेस प्रभाारी एच के पाटील आणि नाना पटोले यांची जवळपास दोन तास बैठक झाली. त्यानंतर हे दोन्ही नेते काँग्रेस संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना भेटण्याकरिता त्यांच्या नर्मदा येथील निवासस्थानी पोहोचले.
या भेटीच्या वेळी राज्याातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नावावरती अंतिम निर्णण घेण्यात आल्याची माहिती पुढे आली. यावेळी लंच पे चर्चा या पद्धतीने विस्ताराने राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावावर निर्णय झाला. यामध्ये विभागीय स्तरीय कार्याध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही झाला. सोबतच ज्या नेत्यांना मंत्रिपद देता आले नाही त्यांची वर्णी कार्याध्यक्षपदी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्तमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागेवर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यासंदर्भात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आता नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button