? दंगल राजकारणाची..अनिल कदमाच्या खेळीने ओझरचे विरोधक अन इच्छुक गारठले
ओझर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडवरच शासनाकडून ओझरला नगरपरिषद स्थापन करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. यासाठी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. नगरपरिषदेच्या कार्यवाहीमुळे ग्रामपंचायत किती दिवस अस्तित्वात राहील असा संभ्रम आहे. त्यात होणारी निवडणूक औटघटकेची तर ठरणरा नाही ना? या संभ्रमाने सर्वच इच्छुक गारठले आहेत. विशेषतः अनिल कदम यांचे पारंपारीक विरोधक यतीन कदमांची कोंडी झाली आहे.
निफाड तालुक्याचे राजकीय सत्ताकेंद्र ओझर राहिले आहे. माजी आमदार अनिल कदम आणि त्यांचे पारंपारीक विरोधक व भाऊबंदकीतील जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्यातून विस्तवही जात नाही.
त्याची झळ प्रत्येक निवडणूकीत प्रस्थापित अनिल कदम यांना बसते. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील यतीन कदम यांच्या उमेदवारीमुळे अनिल कदम यांची ओझरमधील मतांत वाटणी झाली. त्या वाटणीमुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप बनकर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. त्यामुळे सध्या तर खुद्द ओझर ग्रामपंचायत निवडणूक असल्याने अनिल कदम आणि यतीन कदम यांचे पॅनेल अटळ होते. त्यात यतीन कदम यांच्यावर मात करण्यासाठी नगरपरिषदेच्या राजकारणाची खेळी खेळली गेल्याची चर्चा पसरली आहे. ग्रामपंचायत निवडणूक व नगरपरिषदेची प्रक्रिया दोन्ही एकाच वेळी सुरु राहणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत ताकद पणाला लावावी की नाही? हा राजकीय गोंधळ आहे. त्यात बव्हंशी इच्छुक गारठले आहेत.
विधानसभा निवडणुकीत बंद पडलेल्या निफाड साखर कारखान्याचा विषय निघतो. निवडणूक संपली की तो सोयीस्करित्या मागे पडतो. सगळ्यंनाच त्याचा विसर पडतो. हा सगळ्यांचाच अनुभव आजवरचा आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. पराजीत झालेले माजी आमदार कदम म्हणतात मुख्यमंत्री आणि सत्ता आमचीच आहे. सरकार असले तरी राज्यात जे राजकारण चालते ते गांवात चालत नाही. गावातील राजकारणात गट-तट. सोय- गैरसोय, भाऊबंदकी, वाडा अन् आपले परके असा लहान लहान पदर विणावे लागतात. त्यातून राजकारण पुढे सरकते. वरीष्ठांकडून काहीही आदेश आले तरी पक्ष व कार्यकर्ते सांभाळण्यासाठी निवडणुकांत ताकद दाखवावीच लागते. सध्याच्या स्थितीत ओझर ग्रामपंचायतीत शिवसेनेचे अनिल कदम, यतीन कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर असे तीन पॅनेल होतील. मनसे व भाजप कोणाशी हात मिळवणी करतात, कोणत्या पॅनेलमध्ये उमेदवार देतात याची उत्सुकता आहे.






