Maharashtra

?  Big Breaking..महाराष्ट्रात 3 आठवडेचा लॉकडाऊन झाल्यास हे असतील  नियम..!

? Big Breaking..महाराष्ट्रात 3 आठवडेचा लॉकडाऊन झाल्यास हे असतील नियम..!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , मनसे अध्यक्ष राज ठाकरे , चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन (Maharashtra lockdown) आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
ब्रेक द चेन
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी ब्रेक द चेन ही मोहीम हाती घेतली आहे. साखळी तोडण्यासाठी संपर्क तोडणे आवश्यक आहे. त्यासाठीच आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचं चित्र आहे.
लोकल ट्रेनलाही ब्रेक?
पुढच्या लॉकडाऊनमध्ये कदाचित मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला (Mumbai Local) पुन्हा ब्रेकही लागू शकतो. कारण, लोकलमध्ये सर्वाधिक वेगाने कोरोना परसतोय, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल बंद करण्याचा विचारही सरकार करत असल्याचं बोललं जात आहे.
लोकलच्या प्रवासावर पुन्हा निर्बंध आणावे लागतील
विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावर पुन्हा निर्बंध आणण्याचे सूतोवाच केले. लोकल प्रवासासाठी काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा द्यायला पाहिजे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे लोकल प्रवासाचे नवे धोरण आखण्याची गरज असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
केवळ गर्दीची नव्हे तर अनावश्यक सर्व ठिकाणं बंद?
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सर्व बंद ठेवण्यात आलं होतं. सध्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आहेतच, मात्र, आता जी अनावश्यक ठिकाणं आहेत, ती ठिकाणंही पूर्ण बंद ठेवली जाऊ शकतात. शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह. थोडक्यात जिथं जिथं तुम्ही विरंगुळ्यासाठी जाता, ती सगळी ठिकाणं बंद आहेतच.
वीकेंड लॉकडाऊनचे नियमच लागू होणार?
सध्या वीकेंडला ज्याप्रमाणे सर्व बंद ठेवण्यात आलं आहे, तसंच आठवड्यातील सर्व दिवस हेच नियम लागू शकतात. जीवनावश्यक सुविधांची दुकानं वगळता सर्व दुकाने बंद ठेवली जाऊ शकतात. सध्या अनेक शहरात नाईट कर्फ्यू लावला जातो. त्यात धर्तीवर नाईट कर्फ्यू न लावता दिवसा कर्फ्यू लावण्याची तयारी प्रशासन करतंय.
भाजीपाला, किराणा मिळणार का?
भाजीपाला, किराणा आम्हाला मिळणार का? की हा आधीच भरुन ठेवायचा? तर या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकानं एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असू शकते. जेणेकरुन अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही. शिवाय दुकानदार, शेतकरी यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.
आंतरजिल्हा वाहतूक सुरु राहणार का?
काहींचा प्रश्न असाही असू शकतो, की मागील वेळी जशा आंतरजिल्हा बस बंद झाल्या होत्या तशा याही वेळी होतील का? तर सध्या ही आंतरजिल्हा वाहतूक अत्यावश्यक सेवांसाठी सुरु ठेवली जाऊ शकते. अनावश्यक प्रवासास बंधन घातलं जाऊ शकतं. आंतरजिल्हा बस बंद करण्याचा निर्णय परिस्थिती खूपच खराब झाली तर घेतला जाईल असं सरकारी सूत्रांकडून कळतंय. कारण, आंतरजिल्हा वाहतूक बंद केली तर औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचं मोठं नुकसान होतं. ते यंदा होऊ न देण्याचा
प्रयत्न सरकारचा असणार आहे.
एकूणच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता सध्या निर्बंधात सूट तर नाही, मात्र निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात. मात्र, हे करत असताना सामान्यांच्या जीवनावर कमीत कमी परिणाम होईल, अर्थचक्र धीम्या गतीने का होईना फिरत राहिल, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button